शहरांच्या शाश्वत विकासासाठी लोकसहभाग महत्वाचा
By Suyog.joshi | Updated: February 10, 2024 15:59 IST2024-02-10T15:58:32+5:302024-02-10T15:59:07+5:30
अर्बन डेव्हलपमेंट समिट’ परिषदेत तज्ञांचा सूर, ओला, सुका कचऱ्याचे वर्गीकरण गरजेचे.

शहरांच्या शाश्वत विकासासाठी लोकसहभाग महत्वाचा
सुयोग जोशी,नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषद, गामपंचायतींचे प्रश्न वाढत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या शहरांच्या शाश्वत विकासासाठी लोकसहभाग महत्वाचा असून ओला, सुका कचऱ्याचे वर्गीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. पायाभूत सुविधांची पूर्तता केल्यास शहरांचा कायापालट सहज शक्य असल्याचा सूर शाश्वत विकासाबाबत आयोजित परिषदेत तज्ञांकडून उमटला.जयहिंद लोकचळवळ आणि प्रज्ञा फाऊंडेशनतर्फे शहरांचा शाश्वत विकास हे प्रमुख उद्दिष्ट डोळयासमोर ठेवून ‘अर्बन डेव्हलपमेंट समिट’ परिषदेचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते.
व्यासपीठावर आमदार सत्यजित तांबे, विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, प्रज्ञा फाऊंडेशनच्या संचालक प्रियंका शर्मा, प्रतीक्षा देवळेकर, नामदेव गुंजाळ आदी उपस्थित होते. यावेळी तांबे म्हणाले, शहरांचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे, त्याप्रमाणे विकास हाेण्यासाठी लोहसहभागातून विकासाची कामे करण्याची गरज असल्याचे सांगितले.
सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वत:ची उत्पन्नाची साधने निर्माण करावी असेही आवाहन केले. यावेळी कचरा व्यवस्थापनाबद्दल बोलतांना प्रमाेद दब्रासे म्हणाले, ओला कचरा घराघरातून गोळा करण्याची गरज असून सडणारा कचराही रोज गोळा केल्यास प्रदूषणमुक्ती सहज शक्य आहे. प्रत्येक मनपाने कचरा कमी करण्याची धोरणे, नागरिकांचा सहभाग, जागरूकतता आणि समुदाय सहभाग, विशेष श्रेणीतील कचऱ्याचे व्यवस्थापन याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. परिषदेत उत्तर महाराष्ट्रातील मनपाचे अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी, ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचलन निशांत आवडे यांनी केले.
रामकुंडाचे पाणी पिऊ शकतो का?
यावेळी बोलतांना विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, सध्या नद्यांचे प्रदूषण वाढते आहे. आपण रामकूंडाचे पाणी पिऊ शकतो का असा प्रश्न विचारत नद्यांमध्ये वाढलेल्या पाणवेली काढण्याची गरज असल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वी स्मार्ट सिटीअंतर्गत सायकलिंगचा प्रोजेक्ट राबविण्यात आला, पण काही दिवसातच सायकलीच गायब झाल्याचे त्यांनी सांगत जशा समस्या शहरात तशाच ग्रामीण भागातही असल्याचे ते म्हणाले.