गणेशोत्सवासाठी सार्वजनिक मंडळे सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 12:34 AM2019-08-22T00:34:33+5:302019-08-22T00:34:53+5:30

लाडक्या गणरायाच्या आगमनाला पंधरवड्याचा कालावधी शिल्लक असून, लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी गणेशोत्सव मंडळे सज्ज झाली आहेत. पंचवटीतील मंडळांची तयारी सुरू असल्याचे चित्र दिसून येते. सालाबादप्रमाणे छोट्या-मोठ्या मंडळांनी देणगी जमा करण्याबरोबरच मंडप उभारणी कुठे करायची याचे काम सुरू केले आहे.

 Public circles ready for Ganeshotsav | गणेशोत्सवासाठी सार्वजनिक मंडळे सज्ज

गणेशोत्सवासाठी सार्वजनिक मंडळे सज्ज

Next

पंचवटी : लाडक्या गणरायाच्या आगमनाला पंधरवड्याचा कालावधी शिल्लक असून, लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी गणेशोत्सव मंडळे सज्ज झाली आहेत. पंचवटीतील मंडळांची तयारी सुरू असल्याचे चित्र दिसून येते. सालाबादप्रमाणे छोट्या-मोठ्या मंडळांनी देणगी जमा करण्याबरोबरच मंडप उभारणी कुठे करायची याचे काम सुरू केले आहे. विशेष म्हणजे यंदा काही मंडळांनी सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील महापुरात नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ठरवत अवाजवी खर्चाला फाटा देण्याचे निश्चित केले आहे.
येत्या २ सप्टेंबर रोजी गणरायाची विधिवत स्थापना करण्यात येणार आहे. लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी घराघरात गणेशाची प्रतिष्ठापना करणाऱ्या भक्तांनी घरात आकर्षक सजावट करून उत्सवाची पूर्वतयारी आतापासून सुरू केली आहे. परिसरातील दुकानांमध्ये गणरायाच्या विविध छटा असलेल्या मूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. बाप्पांसाठी मखर, चौरंग, पाट सजावट वस्तू विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाºया मित्रमंडळांनी मंडप उभारणीसाठी जागा निश्चित करत बाप्पांच्या स्वागताची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी चौकाचौकात गणरायाच्या स्वागत कमान उभ्या करण्याचे ठरविले असल्याने त्यानुसार कमान बनविण्याचे काम सुरू केले आहे. पंचवटीत यंदाच्या वर्षीदेखील धार्मिक, पारंपरिक तसेच समाज प्रबोधनपर देखावे मंडळांकडून साकारले जाणार असून, त्या दृष्टीने तयारी सुरू करण्यात आली आहे.
अनेक मंडळांचे कार्यकर्ते परजिल्ह्यात देखावे, विद्युत रोषणाई व सजावटीचे साहित्य आणण्यासाठी रवाना झाले आहेत. काही मंडळांमार्फत नागरिकांसाठी दरवर्षीप्रमाणे सांस्कृतिक मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, त्यादृष्टीने कार्यक्रम पत्रिका वाटप करून तयारी सुरू केली आहे.
पंचवटीतील आडगाव, नांदूर, मानूर, मेरी, म्हसरूळ, मखमलाबाद, पेठरोड, सेवाकुंज, नागचौक, राम मंदिर परिसर, जुना आडगाव नाका, नवीन आडगाव नाका, त्रिमूर्तीनगर, हिरावाडी, कृष्णनगर, सरदार चौक, मालवीय चौक, पंचवटी कारंजा, दिंडोरीरोड, रामवाडी, मखमलाबाद नाका, मालेगाव स्टॅण्ड, आरटीओ कॉर्नर आदींसह परिसरातील गणेशोत्सव मंडळांनी देणगी पुस्तके छापून देणगीदारांकडून देणगी जमा करण्याचे काम हाती घेतले आहे.
मंडळांमार्फत ज्या त्या कामाची जबाबदारी मंडळांच्या सदस्यांवर देण्यात येऊन कामे वाटून देण्यात आली आहेत त्यानुसार सदस्य आपल्यावर सोपविलेल्या कामाची जबाबदारी पार पाडत आहे.
वॉटरप्रूफ मंडपाला पसंती
सध्या पावसाळा सुरू असून, आगामी गणेशोत्सव कालावधीत पावसाच्या सरी बसण्याची शक्यता आहे. गणेशोत्सव कालावधीत पाऊस झाला तर देखावे भिजण्याची शक्यता व मंडळाने आयोजित केलेल्या सांस्कृतिक मनोरंजनात्मक कार्यक्रमावर पाणी पडण्याची शक्यता असल्याने अनेक मंडळांनी यंदा वॉटरप्रूफ मंडप उभारणीला पसंती दिली आहे. त्यानुसार वॉटरप्रूफ मंडप उभारले जाणार असल्याचे अनेक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title:  Public circles ready for Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.