मराठा क्रांती मोर्चासाठी जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 23:45 IST2017-08-06T23:45:37+5:302017-08-06T23:45:37+5:30
बीड : ९ आॅगस्ट रोजी मुंबई येथे होणाºया मराठा क्रांती मोर्चाच्या जनजागृतीसाठी वडवणी, पाटोदा, माजलगाव, गेवराई व आष्टी शहरात ...

मराठा क्रांती मोर्चासाठी जनजागृती
बीड : ९ आॅगस्ट रोजी मुंबई येथे होणाºया मराठा क्रांती मोर्चाच्या जनजागृतीसाठी वडवणी, पाटोदा, माजलगाव, गेवराई व आष्टी शहरात रविवारी
दुचाकी रॅली काढण्यात आली. रॅलीत पुरूष, महिलांसह युवक, युवतींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. भगवे झेंडे, टोप्या अन् गळ्यातील रूमालांमुळे वातावरण भगवेमय झाले होते. चारही तालुक्यांमध्ये रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
वडवणी तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी रविवारी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोटार सायकल रॅली काढली. सकाळपासून मोटार सायकल रॅली व मुंबई येथील मोर्चासाठी जनजागृतीची चर्चा होती. ९ वाजल्यापासून ग्रामीण भागातील मराठा समाज दुचाकी मोटार सायकल घेऊन शिवाजी चौकात एकत्र येत होते. शिवाजी चौक, वसंतराव नाईक चौक, डॉ. आंबेडकर चौक ते चाटे चौक मार्गे राम मंदिर येथे पोहचली. दुचाकी रॅली पाहण्यासाठी दुतर्फा नागरिकांची गर्दी होती. रॅलीमध्ये विद्यार्थी, महिला, अबालवृद्धांची मोठी उपस्थिती होती.
माजलगाव मराठा क्रांती मोर्चाच्या जनजागृतीपर दुचाकी रॅलीत सहभागी समाजबांधवांनी डोक्याला भगव्या टोप्या, गळ्यात रूमाल आणि दुचाकीला झेंडे लावल्यामुळे वातावरण भगवेमय झाले होते. मागील पंधरा दिवसापासुन रॅलीसाठी जनजागृती केली जात होती. रविवारी माजलगाव शहरात हजारो तरूणांनी यामध्ये सहभाग नोंदविला. शहरातील मंगलनाथ मैदानातुन रॅली निघून संभाजी चौक, आंबेडकर चौक, हनुमान चौक मार्गे छत्रपती शाळा ते शिवाजी चौकात रॅलीचा समारोप झाला. मोर्चाच्या तयारीसाठी ग्रामीण भागातील मराठा समाजाचा तरूण एकवटला आहे.
आष्टीत सकाळी दुचाकी रॅली काढण्यात आली होती. रॅलीत शिस्त आणि उत्साह पहावयास मिळाला. रॅलीत युवकांची संख्या लक्षणीय होती. ही रॅली सकाळी ११ वाजता आष्टी शहरातील छत्रपती संकुलापासून सुरू झाली. गणपती मंदिर चौक, विनायकनगर, सावतानगर, छत्रपती संभाजी महाराज नगर, अनिलभैय्या नगर, प्राध्यापक कॉलनी, किनारा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, व्यापारी पेठ, कमानवेस, डॉ. आंबेडकर चौकमार्गे छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल येथे समारोप झाला. दुचाकीचा कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात आली.
पाटोदा येथे मागील आठ दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चासंदर्भात जनजागृतीपर दुचाकी रॅलीसंदर्भात नियोजन सुरु होते. ठिकठिकाणी बैठका घेतला जात होत्या. यामध्ये रॅलीत घ्यावयाची काळजी संदर्भात मार्गदर्शन झाले. ९ आॅगस्ट रोजी मुंबई येथे होणाºया मराठा क्रांती मोर्चात संदर्भातही सूचना देण्यात आल्या. रविवारी चुंबळी फाटा येथे सर्व बांधव एकत्र आले. शहरातील विविध मार्गांवरुन दुचाकी रॅली निघाली. त्यानंतर रॅली नगरपंचायत प्रांगणात आली. तेथे समाजबांधवांना मार्गदर्शन करण्यात आले. हजारोंच्या संख्येने समाजबांधव दुचाकीसह रॅलीत सहभागी झाला होता.