सध्याच्या लोकसंख्येनुसार टॅँकरने पाणी पुरवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 17:38 IST2019-03-06T17:37:58+5:302019-03-06T17:38:14+5:30
सिन्नर : शासनाकडून २०११ च्या लोकसंख्येनुसार टॅँकरने माणसी पाणीपुरवठा केला जातो. मात्र गेल्या काही वर्षात लोकसंख्या वाढली आहे. जुन्या लोकसंख्येनुसार पाणी पुरत नाही.

सध्याच्या लोकसंख्येनुसार टॅँकरने पाणी पुरवा
सिन्नर : शासनाकडून २०११ च्या लोकसंख्येनुसार टॅँकरने माणसी पाणीपुरवठा केला जातो. मात्र गेल्या काही वर्षात लोकसंख्या वाढली आहे. जुन्या लोकसंख्येनुसार पाणी पुरत नाही. त्यामुळे सध्याची लोकसंख्या विचारात घेऊन टॅँकरने पाणीपुरवठा करावा असा ठराव पंचायत समितीच्या मासिक आढावा बैठकीत करण्यात आला.
पंचायत समितीचे सभापती भगवान पथवे यांच्या अध्यक्षतेखाली लोकनेते गोपीनाथ मुंडे सभागृहात पंचायत समितीची मासिक आढावा बैठक पार पडली. व्यासपीठावर उपसभापती जगन्नाथ भाबड, शिवसेनेचे गटनेते संग्राम कातकाडे, भाजपाचे गटनेते विजय गडाख, सदस्य रवींद्र पगार, तातू जगताप, शोभा बर्के, योगिता कांदळकर, संगिता पावसे, गटविकास अधिकारी लता गायकवाड आदि उपस्थित होते.
आढावा बैठकीत कृषी, पाणीपुरवठा, वीज, लघुपाटबंधारे, शिक्षण यांच्यासह विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. सध्या तालुक्यात ३७ टॅँकरद्वारे १६ गावे व १९४ वाड्यावस्त्यांना टॅँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. त्यात ६ खासगी व ३१ शासकीय टॅँकरचा समावेश आहे. देवपूर, पंचाळे, सोनारी, श्रीरामपूर- शिंदेवाडी या गावातील वाड्यावस्त्यांचे टॅँकर मागणीचे प्रस्ताव प्रांत कार्यालयात पाठविण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.