शिवरायांच्या अवमानाचा निषेध : भाजपाच्या श्रीपाद छिंदमच्या छायाचित्रांवर द्वारका येथे मारले जोडे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 15:33 IST2018-02-17T15:28:32+5:302018-02-17T15:33:43+5:30
यावेळी कार्यकर्त्यांनी छिंदमच्याविरोधात निषेधाचे फलक झळकविले तसेच फलकावरील त्यांच्या छायाचित्राला काळं फासण्यात आले.

शिवरायांच्या अवमानाचा निषेध : भाजपाच्या श्रीपाद छिंदमच्या छायाचित्रांवर द्वारका येथे मारले जोडे !
नाशिक : अहमदनगरचे भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काढलेल्या अपशब्दांचा निषेध छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडच्या वतीने ‘जोडे मारो’ आंदोलनाने करण्यात आला.
द्वारका येथे शनिवारी दुपारी (दि.१७) मुस्लीम ब्रिगेडचे अजीज पठाण यांच्या नेतृत्वाखाली छिंदमच्या छायाचित्रावर जोडे मारण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवराय यांचा जयजयकार करत छिदम मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. यावेळी अजिज पठाण यांनी राज्य व केंद्र सराकरवर टीका करत शिवरायांच्या राज्यभिषेकाला विरोध करणा-या मनुवादी प्रवृत्तीचे सरकार सत्तेत आल्यानंतर शिवरायांसारख्या महापुरूषांचे अवमान करत प्रवृत्ती दाखवून देत आहे. छिंदमसारखी प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी स्वराज्यामधील मुस्लीम मावळे समर्थ असल्याचे पठाण म्हणाले.
या आंदोलनात जिजाऊ ब्रिगेडच्या माधुरी भदाणे, संभाजी ब्रिगेडचे विलास पाटील, इब्राहीम अत्तार, मुख्तार शेख, अन्सार शेख, रफीक साबीर आदिंनी सहभाग घेतला. यावेळी कार्यकर्त्यांनी छिंदमच्याविरोधात निषेधाचे फलक झळकविले तसेच फलकावरील त्यांच्या छायाचित्राला काळं फासण्यात आले. छिंदमवर कायदेशीर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. ऐन शिवजयंतीच्या तोंडावर छिदम यांनी केलेल्या भ्याड व अवमानकारक वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करत जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या.