महापालिका कर्मचाऱ्यांना वैद्यकीय विम्याचे संरक्षण
By Admin | Updated: January 3, 2017 01:07 IST2017-01-03T01:07:26+5:302017-01-03T01:07:39+5:30
स्थायीची मंजुरी : आठ हजार कर्मचाऱ्यांना होणार लाभ; महापालिका भरणार निम्मी रक्कम

महापालिका कर्मचाऱ्यांना वैद्यकीय विम्याचे संरक्षण
नाशिक : महापालिकेतील सुमारे आठ हजार कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय विमा काढण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने सोमवारी मंजुरी दिली. पुणे येथील दी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीमार्फत सदर वैद्यकीय विमा काढला जाणार असून, त्यासाठी लागणाऱ्या प्रीमिअमची निम्मी रक्कम महापालिका स्वत: भरणार आहे. मागील वर्षी दिवाळीत महापौर अशोक मुर्तडक यांनी मनपा कर्मचाऱ्यांना १४ हजार रुपये सानुग्रह अनुदान घोषित करतानाच एक लाख रुपयांचा वैद्यकीय विमाही काढण्याचे जाहीर केले होते. सदर विमा रकमेसाठी दोन हजार रुपये वार्षिक प्रीमिअम गृहित धरण्यात आला होता. त्यातील एक हजार रुपये महापालिकेने स्वत: भरण्याची तयारी दर्शविली तर उर्वरित एक हजार रुपये कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानातून कपात करून घेतले जाणार होते. त्यामुळे मनपातील आस्थापनेवरील कायम कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात १३ हजार रुपये सानुग्रह अनुदान रोख स्वरूपात मिळाले. यापूर्वी कामगार कल्याण निधीसाठी दिली जाणारी रक्कम ही विमा प्रीमिअमसाठी वर्ग करण्याचे ठरविण्यात आले. दरम्यान, मनपा शिक्षण विभागातील शिक्षक व कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मानधन आणि रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांनाही विमा काढणे बंधनकारक करण्यात आले आणि त्यांच्या सानुग्रह अनुदानातून दोन हजार रुपये कपात करून घेण्याचा निर्णय झाला होता. महापौरांच्या घोषणेनंतर प्रशासनामार्फत वैद्यकीय विम्यासाठी निविदाप्रक्रिया राबविण्यात आली, परंतु दोन वेळेस अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर तिसऱ्यांदा निविदाप्रक्रिया राबविण्यात आली असता, सात कंपन्यांनी प्रतिसाद दिला. त्यातील पाच कंपन्या पात्र ठरल्या. प्रशासनाने केलेल्या तडजोडीनंतर पुणे येथील दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने प्रति २१५० रुपये प्रीमिअमच्या मोबदल्यात कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय विमा काढण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार, सदरचा प्रस्ताव सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ठेवण्यात आला असता समितीने त्यास एकमताने मंजुरी दिली. महापालिकेने यापूर्वीच कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानातून एक हजाराची रक्कम कापून घेतली असून, कामगार कल्याण निधीत एक हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)