ताम्र-पाषाणयुगाचा संरक्षित ‘वारसा’ होतोय नामशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:34 AM2019-11-21T00:34:19+5:302019-11-21T00:35:02+5:30

उत्क्रांतीनंतर प्राचीन युगातील मानवाचे बदलत गेलेले राहणीमान, काळानुरूप त्याला अवगत होत गेलेल्या विविध कला, लागलेले शोध हे सर्व अद्भुतच आहे. त्यापैकी एक ताम्र-पाषाणयुगाची साक्ष देणारा भारतीय पुरातत्त्व विभागाने संरक्षित केलेला वारसा अर्थात काजीची गढी (जुनी मातीची गढी) हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

 The protected 'heritage' of the copper-stone age is disappearing | ताम्र-पाषाणयुगाचा संरक्षित ‘वारसा’ होतोय नामशेष

ताम्र-पाषाणयुगाचा संरक्षित ‘वारसा’ होतोय नामशेष

Next


‘वारसा’ नाशिकचा

नाशिक : उत्क्रांतीनंतर प्राचीन युगातील मानवाचे बदलत गेलेले राहणीमान, काळानुरूप त्याला अवगत होत गेलेल्या विविध कला, लागलेले शोध हे सर्व अद्भुतच आहे. त्यापैकी एक ताम्र-पाषाणयुगाची साक्ष देणारा भारतीय पुरातत्त्व विभागाने संरक्षित केलेला वारसा अर्थात काजीची गढी (जुनी मातीची गढी) हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. कालौघात निम्म्यापेक्षा अधिक गढी गोदावरी नदीच्या पाण्यात वाहून गेली आहे, मात्र याचे कोणालाही सोयरसुतक नाही.
उत्क्र ांतीनुसार जसा मानव बदलत गेला, तसे त्याचे राहणीमानही बदलले. ताम्र, अश्म असे सर्वच युग हे आपापल्या काळातील वैशिष्ट्यपूर्ण कलेसाठी ओळखले जातात. या प्रत्येक युगाची संस्कृती अद्वितीय राहिली आहे. अशाच काही युगांमधील मानवी वस्ती, ते वापरत असलेली मातीची भांडी, जळालेले लाकूड, हाडे, राखेचे ढिगारे, विहिरी, मातीपासून तयार केलेल्या भेंड्यांच्या भिंती, कोळसा झालेली भांडी, मातीची कौलं, काचेच्या बांगड्या, चकाकणारी भांडी जी आजपासून सुमारे २५०० ते ३५०० वर्षांपूर्वीची असावी आणि उत्खननादरम्यान ते पुरातत्त्व विभागाच्या हाती लागले.
काजीच्या गढीवर ख्रिस्तपूर्व ५०० ते १५०० मधील ताम्रयुगातील मानवी वस्ती असावी, असा कयासदेखील पुरातत्त्व विभागाने आढळून आलेल्या जुन्या प्राचीन वस्तूंच्या आधारे लावला आहे.
काजी गढीचा वारसा अखेर ‘बेवारस’च
काळानुरूप या प्राचीन ऐतिहासिक वारशाकडे सर्वच शासकीय यंत्रणांचे सोयीस्कर दुर्लक्ष होत गेले. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या संरक्षित वारसास्थळांच्या यादीत स्थान मिळूनही गढी जणू एकप्रकारे ‘बेवारस’च राहिली. गढीचे संरक्षण कोणत्याही शासकीय खात्याला करता आलेले नाही. सध्या जे रहिवासी येथे वास्तव्यास आहे, त्यांचे संरक्षक भिंतीच्या जुन्या मागणीचे घोंगडे अद्याप भिजतच पडले आहे.
उत्खननानंतर ४ कालखंड झाले निश्चित
१९५०-५१ साली पुरातत्त्व विभागाने गढीवर केलेल्या उत्खननात मानवी अधिवासाचे प्राचीन एकूण ४ कालखंड पुरातत्त्व विभागाने निश्चित केले आहेत. त्यानंतर या वास्तूला संरक्षित स्मारकाचा दर्जा दिला गेला, मात्र या वास्तूच्या संवर्धनासाठी आतापर्यंत कधीही प्रयत्न झाले नाही. गढीवर दाट लोकवस्ती तयार झाली. सध्या काजी गढी धोकादायक ठिकाण म्हणून जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर या धोकादायक गढीवरील रहिवाशांच्या स्थलांतरासाठी प्रशासनाकडून तारेवरची कसरत करण्यात आली होती.

Web Title:  The protected 'heritage' of the copper-stone age is disappearing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.