प्रस्तावित २२० केव्ही उपकेंद्राला गती
By Admin | Updated: March 29, 2017 00:10 IST2017-03-29T00:09:51+5:302017-03-29T00:10:07+5:30
सिन्नर : तालुक्यातील शेतकऱ्यांचा वीजप्रश्न मार्गी लावण्यासाठी माणिकराव कोकाटे यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात वीज वितरण कंपनी अधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली

प्रस्तावित २२० केव्ही उपकेंद्राला गती
सिन्नर : तालुक्यातील पूर्व भागातील वावी, शहा व पाथरे उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांचा वीजप्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनात वीज वितरण कंपनी व पारेषण कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. पूर्व भागातील वीजप्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रास्तावित २२० उपकेंद्राला गती देण्याचा निर्णय यावेळी झालेल्या बैठकीत झाल्याची माहिती माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी दिली.
तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी सहा ते सात वर्षांपासून लागोपाठच्या दुष्काळाने हैराण झाले आहेत. यावर्षी झालेल्या चांगल्या पर्जन्यमानाने पाण्याची पातळी वाढली आहे. मात्र सातत्याने खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याने शेतकरी हैराण झाला आहे. अनेक दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून, कमी दाबाने वीजपुरवठा केला जातो. एकाच विभागात एकाच वेळेस १० ते १५ वीजरोहित्र जळत असून, अधिकारी मुख्यालयात राहात नाही. या पार्श्वभूमीवर माजी आमदार कोकाटे यांनी ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनात वीज वितरण कंपनी व पारेषण कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील वीजसमस्याबाबत आढावा घेतला. वीज वितरण कंपनीचे संचालक साबू, चव्हाण आणि मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी पूर्व भागासाठी सर्वच उपकेंद्र हे १३२ केव्हीपासून सुमारे ८० ते ९० किलोमीटर अंतरावर असल्याने तांत्रिकदृष्ट्या वीजपुरवठा पुरेशा दाबाने मिळून शकत नसल्याचे मान्य केले. त्या अनुषंगाने प्रास्ताविक २२० केव्हीचे उपकेंद्र गरजेचे असल्याचे ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच इन्फ्रा-२ मंजूर असलेले ३३ केव्हीचे दातली, चास आणि विंचूरदळवी येथील सबस्टेशनचे काम तातडीने करण्याचे आदेश दिले. मात्र सदरचे काम पूर्ण होईपर्यंत सिन्नर येथील निमगाव-सिन्नर चे ३३ केव्हीचे उपकेंद्रास निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथून दहा दिवसाच्या आत जोडण्याचे आदेश दिले.
त्याप्रमाणे अक्षय प्रकाश योजने अंर्तगत एनडीएसटी बजेटमधून जिल्हा नियोजन मंडळामार्फत सिंगल फेजसाठी ५ कोटी रुपये मंजूर करण्याबाबत ऊर्जामंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनीहून आदेश दिल्याची माहिती देण्यात आली. त्याप्रमाणे येत्या दहा दिवसांत प्रस्तावित २२० केव्ही उपकेंद्रासाठी प्रस्तावित केलेल्या जागेची पाहणे करण्यासाठी वीज वितरण व पारेषण कंपनीचे संचालक साबू आणि चव्हाण स्वत: येवून तात्काळ निविदा काढणार आहेत. सदर कामाचे येत्या १५ जून रोजी भूमिपूजन करण्याचे व दातली व चास येथील ३३ केव्ही उपकेंद्राचे उद्घाटन करण्याचे आश्वासन ऊर्जामंत्र्यांनी दिल्याची माहिती देण्यात आली.
या बैठकीस सिन्नर बाजार समितीचे सभापती अरुण वाघ, पंचायत समिती सदस्य रवींद्र पगार, बाबा कांदळकर, सतिष कोकाटे, राजेेंद्र कोकाटे, सोपान वायकर, योगेश घोटेकर, शांताराम पगार, संजय वारुळे, शांताराम कोकाटे, आत्माराम पगार, शांताराम झाडे, अमित घोटेकर उपस्थित होते. (वार्ताहर)
कोकाटे यांनी श्रेय घेऊ नये : शिवसेना
पूर्व भागातील नियोजित २२० केव्ही वीज उपकेंद्र मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून, या सर्व कामाचा पाठपुरावा आमदार राजाभाऊ वाजे यांनीच केला आहे. या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न माजी आमदार कोकाटे यांनी करु नये असे पत्रक शहा परिसरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिले आहे. पूर्व भागातील विजेच्या प्रश्नासंदर्भात वाजे व शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने यापूर्वीच ऊर्जामंत्र्यांसमवेत बैठक घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे.