मनपा शाळांमध्ये ‘ग्रीन जीम’चा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2016 00:20 IST2016-06-05T00:17:40+5:302016-06-05T00:20:50+5:30

शिक्षण सभापती : पहिल्याच दिवशी गणवेश

Proposal of 'Green Gym' in NMC schools | मनपा शाळांमध्ये ‘ग्रीन जीम’चा प्रस्ताव

मनपा शाळांमध्ये ‘ग्रीन जीम’चा प्रस्ताव

नाशिक : महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडेही जातीने लक्ष पुरविण्यासाठी मैदान असलेल्या ठिकाणी ग्रीन जीम बसविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आल्याची माहिती शिक्षण समितीचे सभापती संजय चव्हाण यांनी दिली. दरम्यान, शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना गणवेश आणि पुस्तकांचे वाटप करण्यात येणार असल्याचेही चव्हाण यांनी जाहीर केले आहे.
शिक्षण समितीचे सभापती संजय चव्हाण यांनी सांगितले, शासन निर्णयानुसार येत्या १५ जून पासून मनपा शाळा सुरू करण्यात येणार आहे. त्यापूर्वी दि. १० ते १५ जून या कालावधीत प्रवेशोत्सव साजरा केला जाणार आहे. मनपा शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून, नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार आहे. मनपा शाळांमध्ये गोरगरीब, मध्यमवर्गीयांच्या पाल्यांचा समावेश आहे. मुला-मुलींच्या आरोग्याच्यादृष्टीने ज्या शाळांमध्ये मैदान, क्रीडांगण आहे तेथे ग्रीन जीम बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी संबंधित शाळांकडून माहिती मागविण्यात आली असून तसा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. यंदा शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व संवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाणार आहे. खुल्या आणि ओबीसी संवर्गातील सुमारे साडेआठ हजार विद्यार्थ्यांनाही गणवेश देण्याच्या निर्णयाला स्थायी समितीने नुकतीच मंजुरी दिली असून, गणवेश वाटपाबाबतचेही नियोजन करण्यात येत आहे.
यावर्षापासून मनपा शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी सेमी इंग्रजी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून, नुकत्याच झालेल्या आॅनलाइन बदल्यांमध्ये प्रत्येक शाळेत गणित, विज्ञान आणि इंग्रजी विषयासाठी शिक्षक देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Proposal of 'Green Gym' in NMC schools