मनपा गाळे भाडेवाढीचा प्रस्ताव
By Admin | Updated: October 14, 2016 00:41 IST2016-10-14T00:29:39+5:302016-10-14T00:41:50+5:30
आज महासभेत चर्चा : भाडेवाढीस सर्वपक्षीय विरोध

मनपा गाळे भाडेवाढीचा प्रस्ताव
नाशिक : महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळ्यांची नव्याने भाडेवाढ प्रस्तावित करण्यात आली असून, शुक्रवारी (दि.१४) होणाऱ्या महासभेत त्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गुरुवारी महापौरांच्या उपस्थितीत झालेल्या सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत प्रस्तावित भाडेवाढीस विरोध करण्यात आला.
महापालिकेच्या मालकीच्या ५६ व्यापारी संकुलातील १७३१ व्यापारी गाळ्यांची मुदत संपुष्टात आली आहे. यापूर्वी महापालिकेने २०१२ मध्ये रेडीरेकनरनुसार गाळेधारकांना भाडेआकारणी सुरू केली आणि त्यानुसार गाळेधारक भाडेही भरत आले आहेत. मात्र, दीड वर्षापूर्वी डॉ. प्रवीण गेडाम आयुक्त असताना त्यांनी प्रचलित रेडीरेकनर दरानुसार भाडेआकारणी करतानाच मुदत संपलेल्या गाळ्यांचा फेरलिलाव काढण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यावेळी भाडेवाढीच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली, परंतु सर्वपक्षीय गटनेत्यांनी प्रस्तावित भाडेवाढीस विरोध दर्शविला. त्यामुळे महासभेत सादर होणारा प्रस्ताव फेटाळला जाण्याची शक्यता आहे.
बैठकीला उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समिती सभापती सलीम शेख, सभागृहनेत्या सुरेखा भोसले, मनसेचे गटनेते अनिल मटाले, अपक्ष गटनेते संजय चव्हाण, कॉँग्रेसचे शाहू खैरे, माकपचे तानाजी जायभावे, भाजपाचे सतीश कुलकर्णी, नीलिमा आमले, सूर्यकांत लवटे, किशोर बोर्डे, उपआयुक्त रोहिदास बहिरम आदि उपस्थित होते.