मका पिकावर रोगाचा प्रदुर्भाव
By Admin | Updated: July 25, 2016 23:06 IST2016-07-25T23:01:32+5:302016-07-25T23:06:56+5:30
खामखेडा : दिवाळी सण, रब्बी हंगामासाठी पैसा देणारे उत्पादन

मका पिकावर रोगाचा प्रदुर्भाव
खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा परिसरातील मका पिकावर विविध रोगांच्या प्रदुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.
खामखेडा परिसरात दरवर्षी मका पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. हजारो ऐक्टर क्षेत्र मका पिकाच्या लागवडी खाली असते. मका या पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते. परिसरातील प्रत्येक शेतकरी हमखास मक्याची पेरणी करतो. कारण ऐन दिवाळी सणाच्या वेळी हे पीक तयार होऊन शेतकऱ्यांच्या हाती दिवाळी सणासाठी व रब्बी हंगामासाठी पैसा उपलब्ध होतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील मका पीक फार महत्त्वाचे आहे.
दोन-तीन वर्षांपासून सतत कमी पडणारा पाऊस आणि मक्याचे पीक ऐन दाणे भरण्याच्या वेळस पावसाने दिलेली ओढ तसेच मका कापणीच्या बेमौसमी पावसाचा धुमाकूळ यामुळे हाती आलेली मक्याची कणसे या पावसाने भिजून मक्याचे दाणे खराब होऊन मक्याचे नुकसान होते. त्यामुळे मक्याला योग्य भाव मिळत नसल्याने दोन-तीन वर्षांपासून शेतकरी जरीस आला आहे.
चालू वर्षी खामखेडा परिसरात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने शेतकऱ्याने मोठ्या अपेक्षेने मक्याची पेरणी केली आहे. मका पिकाची पेरणी केल्यानंतर सतत ढगाळ वातावरण व सूर्यप्रकाश पडत नसल्याने मक्याची वाढ न होता, पीक पिवळे पडू लागले आहे.
मका पिकास कीड व तुडतुडे रोगाचा प्रदुर्भाव दिसू लागल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. या रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी पिकावर रोगप्रतिबंधक विविध औषधे व पावडरची फवारणी करताना दिसून येत आहे. (वार्ताहर)