गेट बसविण्याचा प्रयत्न प्रकल्पग्रस्तांनी उधळून लावला

By Admin | Updated: September 1, 2015 22:29 IST2015-09-01T22:26:07+5:302015-09-01T22:29:29+5:30

वाकी खापरी धरण : पुनर्वसन करण्याच्या भूमिकेवर धरणग्रस्त ठाम

The project seekers tried to set off the gate by project workers | गेट बसविण्याचा प्रयत्न प्रकल्पग्रस्तांनी उधळून लावला

गेट बसविण्याचा प्रयत्न प्रकल्पग्रस्तांनी उधळून लावला

गेट बसविण्याचा प्रयत्न प्रकल्पग्रस्तांनी उधळून लावलावाकी खापरी धरण : पुनर्वसन करण्याच्या भूमिकेवर धरणग्रस्त ठामघोटी : इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरणासाठी शासनाने संपादित केलेल्या शेतजमिनी, घरांचे पेमेंट आणि पुनर्वसन प्रलंबित असताना या प्रकल्पग्रस्तांचा कडवा विरोध झुगारून या धरणात पाण्याचा साठा करण्यासाठी गेट बसविण्याचा प्रयत्न संतप्त प्रकल्पग्रस्तांनी तिसऱ्यांदा उधळून लावला. मंगळवारी (दि.१) धरणग्रस्तांनी मनसेच्या उपजिल्हाप्रमुख रतनकुमार इचम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले.
घोटी-वैतरणा रस्त्यावर कोरपगाव शिवारात असलेल्या वाकी खापरी धरणग्रस्तांच्या अनेक मागण्या व प्रलंबित प्रश्न धरणाचे काम पूर्ण होत आलेले असताना शासनाने पुनर्वसन पूर्ण न केल्याने धरणग्रस्त संतप्त झाले आहेत. यात धरणासाठी संपादित केलेल्या चार गावांचे अद्यापही पुनर्वसन न केल्याने या धरणग्रस्तांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शासनाने या गावांचे तातडीने पुनर्वसन करावे, अशी मागणी सातत्याने होत असताना या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने धरणग्रस्तात संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, शासनाकडून या धरणावर पाणी साठविण्यासाठी टाकण्यात येणारे गेट बसविण्याचा प्रयत्न आजही होणार असल्याची कुणकुण धरणग्रस्तांना लागल्याने संतप्त धरणग्रस्तांनी मंगळवारी तिसऱ्यांदा हा प्रयत्न उधळून लावला. या धरणात या वर्षापासून एकहजार द.ल.घ.फू. पाणीसाठा करण्याचे शासन विचाराधीन आहे; मात्र जोपर्यंत पुनर्वसन पूर्ण होत नाही तोपर्यंत पाणी साठविण्यासाठी गेट बसवू देणार नाही, असा इशारा धरणग्रस्तांनी दिला आहे.
घोटी-वैतरणा रस्त्यावर कोरपगाव शिवारात गेल्या पंधरा वर्षांपासून वाकी खापरी धरणाचे काम होत असून, आरंभीपासूनच शासनाने या धरणग्रस्तांच्या अनेक मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने या धरणग्रस्तांनी धरणाचे काम अनेकदा बंद पाडले आहे. या बाबीची दखल घेत केवळ आश्वासने देऊन व वेळप्रसंगी पोलीस बळाचा वापर करीत धरणाचे काम करण्यात येत होते. दरम्यान, विद्यमान स्थितीत या धरणाचे काम ऐंशी टक्के पूर्ण झाले असून केवळ वीस टक्के काम बाकी आहे. काम पूर्णत्वास येऊनही अद्यापही संपादित केलेल्या वाळविहीर,भावली,पिंपळगाव भटाटा, व कोरपगाव या गावांचे पुनर्वसन करण्यात आले नाही, यावर्षी धरणाचे काम पूर्ण होऊन पाणी साठवले जाईल. परिणामी या चार गावांच्या धरणग्रस्तांना निवाऱ्याचा प्रश्न निर्माण होईल. यामुळे या धरणग्रस्तांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.
धरणासाठी मोठ्या प्रमाणात जमिनी संपादित केल्या असून या जमिनीचा अद्यापही मोबदला देण्यात आला नाही. जिल्हा न्यायालयाने या प्रकल्पग्रस्तांना वाढीव नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले असताना अद्यापही भरपाई देण्यात आली नाही, उपसा सिंचन योजना राबविण्यात यावी, धरणग्रस्तांचे दाखले त्वरित देण्यात यावे, धरणग्रस्तांना पाणी उचलण्याची परवानगी व शासकीय, निमशासकीय पातळीवर नोकऱ्यांसाठी प्राधान्य द्यावे तसेच प्रकल्पग्रस्त घरमालकांना घरे बांधण्यासाठी मोफत भूखंड व सानुग्रह अनुदान देण्यात यावे, खास बाब म्हणून मंजूर केलेल्या भावली बुद्रुकच्या पुनर्वसनाची कार्यवाही तातडीने करा आदि मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत.
दरम्यान मंगळवारी (दि.१) वाकी खापरी धरणावर धरणग्रस्तांचा विरोध डावलून गेट बसविणार असल्याची माहिती धरणग्रस्तांना मिळाली, यानुसार सकाळी या गेटची सामग्री या धरणावर आली असता जमा झालेल्या धरणग्रस्तांनी गेट बसविण्यास कडवा विरोध करीत आम्ही गेट बसवू देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला. सहायक अभियंता हरिभाऊ गिते यांना घेराव घातला.
दरम्यान, या मागण्या पूर्ण न झाल्यास सदर धरणात पाण्याचा एक थेंबही साठू देणार नाही तसेच सदरचे गेट उभारणीचे काम करू देणार नाही, असा इशारा कृती समितीचे रतनकुमार इचम यांच्यासह पंचायत समिती सदस्य लहानू हिंदोळे, प्रभाकर इचम, रावजी नाडेकर, काशिनाथ कोकणे, श्रावण तेलम, रामचंद्र पाचारणे, लहानू गायकवाड, चंदर पथवे, कचरू शेळके, कारभारी गायकवाड, देवीदास हिंदोळे, कचरू इचम, शिवाजी कोकणे, मीराबाई पाचरणे, हिराबाई पाचरणे आदिंसह सहायक अभियंता हरिभाऊ गिते, ठेकेदार पुसदकर आदि उपस्थित होते.

धरणाचे गेट टाकले तर धरणात होणाऱ्या पाणीसाठ्यामुळे भावली गावठाणाचे कोणतेही नुकसान होणार नाही. गावांचे पुनवर्सन झाल्यानंतर शासनाने विशेष बाब म्हणून भावली बुद्रुक गावाचे पुनवर्सन करणार आहे. प्रकल्पग्रस्तांनी गेट टाकणे कामी सहकार्य करावे. धरणाचे गेट टाकले तर धरणात एक टीएमसी पाणीसाठा तयार होऊन उन्हाळ्यात शेती व पिण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध होईल. या धरणाला गेट लावण्याचे केवळ विचाराधीन असून प्रकल्पग्रस्तांची मानसिकता निर्माण झाल्यानंतर हे गेट बसविण्यात येईल.
- हरिभाऊ गिते, सहायक अभियंता

Web Title: The project seekers tried to set off the gate by project workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.