प्रकल्प बंदिस्त; पर्यटन उद््ध्वस्त...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 12:52 AM2019-11-16T00:52:26+5:302019-11-16T00:53:47+5:30

कुंभनगरी म्हणून सर्वदूर ओळख असलेल्या नाशिकच्या पर्यटनाला चालना मिळणार तरी कधी? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहे. पर्यटनाला ‘बुस्ट’ देणाऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पांना वर्षानुवर्षांपासून राजकीय अनास्था व प्रशासकीय उदासीनतेमुळे खीळ बसलेली आहे.

 Project closure; Destroy tourism ... | प्रकल्प बंदिस्त; पर्यटन उद््ध्वस्त...

प्रकल्प बंदिस्त; पर्यटन उद््ध्वस्त...

Next

नाशिक : कुंभनगरी म्हणून सर्वदूर ओळख असलेल्या नाशिकच्या पर्यटनाला चालना मिळणार तरी कधी? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहे. पर्यटनाला ‘बुस्ट’ देणाऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पांना वर्षानुवर्षांपासून राजकीय अनास्था व प्रशासकीय उदासीनतेमुळे खीळ बसलेली आहे. त्यामुळे नाशिककरांच्या घरी आलेल्या पाहुण्यांना नाशिकच्या आजूबाजूला नेमके पर्यटन घडवायचे तरी कसले? हा यक्षप्रश्न सतावतो. राज्याने निधी पुरविला नाही तर केंद्राकडून मिळालेला चार कोटींचा खर्च पाण्यात जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
निवडणुका नुकत्याच पार पडल्या आणि रिंगणातील प्रत्येक उमेदवाराने पर्यटन आणि पर्यावरणाचा आपापल्या जाहीरनाम्यात उदोउदो केला, मात्र प्रत्यक्षात पर्यटनाला वाव जरी असला तरी त्यादृष्टीने धोरणात्मक निर्णय घेत विविध प्रकल्पांना गती दिली जात नसल्याने नागरिकदेखील संभ्रमात पडले आहेत. गंगापूर धरण परिसरात पर्यटकांचा राबता असतो, मात्र तेथील बोट क्लब अद्यापही धूळखात पडलेला असून, कोट्यवधी रुपयांच्या बोटींसह या प्रकल्पावर पाणी फिरले आहे. या इमारतीचा अन्य दुसºया तरी कारणासाठी उपयोग व्हावा, अशी मागणी होत आहे.
गोदावरी परिचय उद्यानाचे तीन तेरा
नाशिककरांच्या सर्वाधिक पसंतीचे ठिकाण दूधस्थळी (सोमेश्वर) धबधबा परिसराच्या सौंदर्यीकरणाची अद्याप कुणालाही गरज वाटलेली नाही. लाखो रुपये खर्च करून महापालिकेने येथे साकारलेल्या गोदावरी परिचय उद्यानाची पुरती वाट लागली आहे. हे उद्यान केवळ ओसाड मोकळे भूखंड बनून राहिले आहे. उद्यानाच्या देखभाल दुरुस्तीकडे मनपासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेतील हा प्रकल्पदेखील गोदाकाठी बुडाला, असे म्हणणे वावगे ठरू नये. धबधब्याच्या परिसरात येणाºया पर्यटकांसाठी मनपा अद्याप प्रसाधनगृह व पाणपोईचीदेखील सुविधा उपलब्ध करून देऊ शकलेली नाही. देखभाल दुरुस्तीअभावी या उद्यानाची अवस्था कमालीची बिकट झाली आहे. गर्दुल्ले, जुगारी, मद्यपींचा अड्डा म्हणून या उद्यानाकडे बघितले जाऊ लागले आहे. त्याचा त्रास धबधब्याच्या परिसरात आनंद घेण्यासाठी येणाºया पर्यटकांनाही कायमस्वरूपी सहन करावा लागत आहे.
राज्याकडून निधी नाही
‘कलाग्राम’च्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे १२ ते १५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. केंद्राकडून सुमारे चार कोटी रुपयांचा निधीही सुरुवातीला पुरविला गेला, मात्र त्यानंतर केंद्राने योजना बंद पडल्याचे सांगून उर्वरित निधी पुरविला नाही. परिणामी ‘कलाग्राम’चा प्रकल्प अंतिम टप्प्यात येऊन रखडला. उर्वरित कामासाठी राज्याच्या पर्यटन विभागाक डून जोपर्यंत निधी येत नाही, तोपर्यंत क लाग्रामचे ग्रहण सुटणार नाही.
राज्य पर्यटन विकास महामंडळाने गोवर्धन शिवारात ‘कलाग्राम’चा प्रकल्प मागील पाच वर्षांपूर्वी हाती घेतला होता. केंद्राच्या निधीतून हा प्रकल्प साकारला गेला, मात्र अंतिम टप्प्यात निधी अपुरा पडल्याने कलाग्रामला तीन ते चार वर्षांपासून लागलेले ग्रहण सुटता सुटत नसल्याने या प्रकल्पावर अद्याप करण्यात आलेला कोटींचा खर्च पाण्यात गेल्यासारखा आहे. केंद्राचा निधी संपून तीन वर्षे उलटली असून, पर्यटन मंत्रालयाकडून या प्रकल्पाचा ‘कळस’ चढविण्यासाठी निधी अजूनही उपलब्ध करून देण्यात आलेला नाही, हे दुर्दैवच. हा प्रकल्प अधांतरी असताना गंगापूर धरण परिसरात पर्यटन महामंडळाने कोट्यवधी रुपये खर्च करून ‘ग्रेप रिसॉर्ट’ची देखणी वास्तू साकारली, मात्र दोन वर्षांपासून हा प्रकल्प अजूनही कार्यान्वित होऊ शकलेला नाही.

Web Title:  Project closure; Destroy tourism ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.