सायनेच्या युवकाकडून मराठी चित्रपटाची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:15 IST2021-09-26T04:15:14+5:302021-09-26T04:15:14+5:30
सुनील बोडके वेळुंजे : ग्रामीण कलाकाराला अभिनयाचे प्रशिक्षण आणि धडे हे सहसा कुठल्या शाळेत दिले जात नसतात, तर ...

सायनेच्या युवकाकडून मराठी चित्रपटाची निर्मिती
सुनील बोडके
वेळुंजे : ग्रामीण कलाकाराला अभिनयाचे प्रशिक्षण आणि धडे हे सहसा कुठल्या शाळेत दिले जात नसतात, तर ते निसर्गाला अनुसरून अवतीभोवती वातावरण आणि घरातील उंबऱ्याबाहेरील रस्त्यावरील दिसणाऱ्या सततच्या बदलत्या काळाला अनुसरून तो आपल्या भावविश्वात जगण्याचे धाडस करत असतो.
चित्रपटनिर्मिती ही धनदांडगे मंडळींचे टीमवर्क. मात्र, नाशिकच्या आनंद पगारे या युवकाने स्वतःच्या पुकार फिल्म प्रॉडक्शनच्या निर्मिती खाली ‘सपान सरल’ हा मराठी चित्रपट साकारला. या निर्मितीसाठी स्वतःचा अभ्यास व आयुष्याची पुंजी खर्ची घालून सातत्याने सामान्य माणसाला भेडसावणारा व स्वतःला अस्वस्थ विषय त्यांनी घेतला. तब्बल २ वर्षे अनेक अडथळे पेलत आनंद ऊर्फ दादाजी पगारे यांनी हा चित्रपट साकारला आहे. याकामी त्याला सामाजिक चळवळीतील सहकाऱ्यांची साथ लाभली असल्याचे ते सांगतात.
दरम्यान, चित्रपटनिर्मिती म्हटली की आपल्या डोळ्यासमोर मोठी नावे येतात. त्यासाठी मोठे टीमवर्क लागते. त्यात जाणकार व अनुभवी मंडळींची साथ असते. तेव्हाच निर्मिती होते. या क्षेत्रात सध्या नव्या दमाचे अनेक निर्माते येत असले तरी स्व. चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या जन्मभूमीत नाशिकच्या भूमीतील सायने या छोट्या गावातील आनंद पगारे या युवकाने आपल्या अभ्यास व जिद्दीच्या जोरावर उत्तम तंत्रज्ञ व डिजिटल आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ‘सपान सरल’ हा मराठी चित्रपट यशस्वीपणे पूर्ण केला आहे. त्यासाठी त्याला त्यातील जोडलेल्या कला क्षेत्रातील धडपड्या मित्रांचा तसेच व्यवस्थापन व संवादकौशल्याचा या निर्मितीसाठी लाभ झाला. स्वतःची परिस्थिती विसरून त्याने मराठी चित्रपट महामंडळाकडून स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस नोंदणी करून आपल्या स्वलिखित पटकथा, संवाद, स्क्रिप्ट रजिस्टर्ड करून ही निर्मिती केली. नाशिकमध्ये चित्रपट, माहितीपट, अल्बम, टेलिफिल्म, वेबसिरीज निर्मितीच्या चित्रीकरणास संधी आहे. त्यादृष्टीने जल, जमीन, जंगल या नैसर्गिकस्थितीत आपले खडतर जीवन जगणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित, तसेच संबंधित पात्रांच्या एका शासकीय योजनेसाठीची ससेहोलपट दर्शवणारा व वास्तवकतेशी जोडलेल्या विषयाचा ‘सपान सरल’ हा मराठी चित्रपट नाशिक जिल्ह्यातील पेठ, जव्हार, पालघर, नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी या तालुक्यांत चित्रित केला आहे. एकूणच या चित्रपटाची निर्मिती दिग्दर्शन, कॅमेरामन म्हणून आनंद पगारे, प्रॉडक्शन किरण मोरे, सुरेश ताठे, पटकथा, गीतलेखन दिवंगत शंतनू कांबळे, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपळद येथील गीतलेखक गायक नाना गांगुर्डे, संगीतकार मधुकर रेडकर, देवानंद पाटील, गीत गायक म्हणून रवींद्र साठे, दीपाली गांगुर्डे, निशा भगत यांची साथ लाभली आहे. या चित्रपटात दिवंगत वीरा साथीदार, मायाताई खोडवे, विलास कांबळे, प्रा. राजू देसले, राम खुर्दळ, योगेश कापसे, रामदास उन्हाळे, सुनील मोरे, गोकुळ पवार, डॉ. विशाल जाधव, प्रमिला पवार यांच्या भूमिका आहेत.
कोट...
पुकार फिल्म प्रॉडक्शनच्या माध्यमातून ‘सपान सरल’ या चित्रपटाची निर्मिती झाली. उत्तम डिजिटल तंत्रज्ञान वापरून कॅमेरा, साउंड, एडिटिंग, असे उत्तम तंत्रज्ञान असलेला हा नाशिकची निर्मिती असलेला मराठमोळा चित्रपट सामान्य शेतकऱ्यांची सामान्य शासकीय योजनेसाठी होणारी धडपड व त्यात त्याने गमावलेले स्वास्थ्य व त्याचे होणारे विस्थापन यावर या चित्रपटात प्रकाश टाकलेला आहे.
-आनंद पगारे, निर्मिता व दिग्दर्शक
250921\img-20210924-wa0052.jpg
सपान सरल"मराठी चित्रपटाचे पोस्टर