सोनसाखळी चोरी रोखण्यासाठी पंचवटी पोलिसांकडून उद्घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 17:04 IST2020-02-27T17:04:08+5:302020-02-27T17:04:27+5:30
पंचवटी परिसरात वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी जनजागृती मोहीम हाती घेत महिलांना सावध करण्यावर भर दिला आहे. गस्तीदरम्यान, पोलीस वाहनांवरील भोंगे आता वाजू लागले आहे.

सोनसाखळी चोरी रोखण्यासाठी पंचवटी पोलिसांकडून उद्घोषणा
नाशिक : ‘महिलांना सावधानतेचा इशारा...पायी जाताना अनोळखी इसमाने पत्ता विचारल्यास दुर्लक्ष करा, हेल्मेटधारी दुचाकीस्वारांकडून पाठलाग होत असेल तर तत्काळ ‘१००’ क्रमांक फिरवा, संशयितांकडे कानाडोळा करू नका, तो सोनसाखळी चोरही असू शकतो, अशा उद्घोषणा गल्लीबोळात मागील तीन ते चार दिवसांपासून रहिवाशांच्या कानी पडत आहे.
पंचवटी परिसरात वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी जनजागृती मोहीम हाती घेत महिलांना सावध करण्यावर भर दिला आहे. गस्तीदरम्यान, पोलीस वाहनांवरील भोंगे आता वाजू लागले आहे. या भोंग्यांद्वारे पादचारी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जात आहे. संशयित सोनसाखळी चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पंचवटी पोलीस हा नवीन प्रयोग राबवितांना दिसून येत आहे.
पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून २५-२७ या वयोगटांतील चोरटा पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून पोबारा करत आहेत. सोनसाखळी चोरांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस आयुक्तांकडून काही दिवसांपूर्वीच पोलिसांना रोख बक्षिसासह क्राइम ब्रॅन्चमध्ये पोस्टिंग अशी मेगाआॅफरही दिली होती. सोनसाखळी चोरीला आळा बसावा यासाठी पोलिसांनी नागरी वसाहत, मोकळा रस्ता, यापूर्वी सोनसाखळी ओरबाडून नेल्याच्या घटना ज्या परिसरात घडल्या, त्या भागात दिवसभर पंचवटी पोलिसांकडून गस्त घालत सोनसाखळी चोराचे वर्णन देत, रस्त्याने पायी चालत जाणा-या पादचारी महिलांनी आपल्या गळ्यातील दागिने, मंगळसूत्र, मोबाइल, पर्सची सुरक्षितता कशी बाळगावी, याबाबत प्रबोधन करत आहेत. वर्दळीच्या परिसरात नियमितपणे पोलिसांकडून वाहन थांबवून नागरिकांना आवाहन करत विविध सूचनाही दिल्या जात आहेत.