वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:39 IST2021-02-05T05:39:25+5:302021-02-05T05:39:25+5:30

नाशिक : शहरातील काही चौकांतील वाहतूक बेटांची दुरवस्था झाली आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त ...

The problem of traffic jams persists | वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम

वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम

नाशिक : शहरातील काही चौकांतील वाहतूक बेटांची दुरवस्था झाली आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. या वाहतूक बेटांची स्वच्छता करून डागडुजी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

गतिरोधकांजवळ पांढरे पट्टे नसल्याने नाराजी

नाशिक : औरंगाबाद महामार्गावर ठिकठिकाणी करण्यात आलेल्या गतिरोधकांजवळ काही ठिकाणी पांढरे पट्टे नसल्याने वाहनचालकांना अंदाज येत नाही. यामुळे अनेकवेळा गतिरोधकांवर वाहने आदळतात. त्यामुळे वाहनचालकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. काही वाहनचालकांना यामुळे पाठीच्या मणक्याच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येत आहे.

डिझेलमुळे ट्रॅक्टरचालकांनी केली दरवाढ

नाशिक : डिझेलचे दर वाढल्याने ग्रामीण भागात ट्रॅक्टरचालकांनी नांगरणी, वखरणीचे दर वाढविले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी या कामांसाठी अधिक पैसे मोजावे लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. पीक येण्याआधीच मोठी आर्थिक गुंतवणूक करावी लागत आहे.

ग्रामीण भागात प्रशिक्षणांचे फुटले पेव

नाशिक : बदलत्या शेतीविषयक धोरणांमुळे ग्रामीण भागांत विविध प्रशिक्षणांचे पेव फटले असून यासाठी ग्रामीण तरुणांना वेगवेगळी आश्वासने दिली जात आहेत. त्यामुळे या तरुणांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. काही ठिकाणी प्रशिक्षणाबरोबरच विविध आर्थिक गुंतवणुकीचे सल्ले दिले जात आहेत. अशा बनावट कंपन्यांपासून तरुणांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

सिग्नलजवळ बस थांबत असल्याने गैरसोय

नाशिक : नांदुरनाका चौकात सिग्नलजवळच बाहेरगावच्या बस थांबत असल्याने प्रवाशांची धावपळ होते. बस सिग्नलजवळ थांबत असल्याने काहीवेळा या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. वयोवृद्ध प्रवाशांची यामुळे गैरसोय होते. येथील बसथांब्याची जागा बदलावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

उघड्यावरील केबल बनली धोकादायक

नाशिक : टाकळी रोडवर शिवरामनगर जवळ वीज वितरण कंपनीने पथदिपांसाठी लावलेली केबल भूमिगत न करता उघड्यावरच ठेवल्याने ती धोकादायक बनली आहे. रात्रीच्यावेळी अनेक पादचाऱ्यांना या केबलचा अंदाज येत नसल्याने अडखळतात. ही केबल भूमिगत करण्याची मागणी परीसरातील नागरिकांनी केली आहे.

Web Title: The problem of traffic jams persists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.