येवल्यात ऑक्सिजन तुटवड्याचा प्रश्न कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:14 IST2021-05-12T04:14:56+5:302021-05-12T04:14:56+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख सहा खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले जात असून उपजिल्हा रुग्णालयासह नगरसूल ग्रामीण रुग्णालयात डेडीकेटेड ...

येवल्यात ऑक्सिजन तुटवड्याचा प्रश्न कायम
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख सहा खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले जात असून उपजिल्हा रुग्णालयासह नगरसूल ग्रामीण रुग्णालयात डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर करण्यात आले आहे. परिणामी ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. मागणीच्या तुलनेत ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याने रुग्णालयांनी बेड क्षमता असतांनाही क्षमतेपेक्षा कमी बेड सुरू ठेवले आहेत. परिणामी रुग्णांची गैरसोय होत आहे.
उपजिल्हा रुग्णालयाची ६७ बेडची क्षमता असतांना ऑक्सिजन तुटवड्यामुळे ४३ बेड सुरू ठेवण्यात आले आहेत. तर नगरसूल येथील ग्रामीण रुग्णालयाची ३० बेडची क्षमता असताना २५ बेड सुरू ठेवण्यात आले आहेत. उपजिल्हा रुग्णालय येथे ऑक्सिजन प्लांट मंजूर झालेला असून तो कार्यान्वित होण्यासाठी अवधी जाणार आहे. तर नगरसूल ग्रामीण रुग्णालयासाठी किमान जादा ऑक्सिजन सिलिंडर देणे तातडीचे बनले आहे.
---------------------
नगरसूल ग्रामीण रुग्णालयात सद्यस्थितीला दोन वैद्यकीय अधिकारी, दोन डाटा एंट्री ऑपरेटर, एक औषध निर्माण अधिकारी, दोन वार्ड बॉय, सफाई कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे आहे त्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडतो आहे. ही पदे तातडीने भरण्याची मागणी केली जात आहे.