आयुक्तांना अवमान याचिका पूर्व नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 23:57 IST2019-11-12T23:56:49+5:302019-11-12T23:57:13+5:30
उच्च न्यायालयाने भंगार बाजार हटविण्याचे आदेश दिल्यानंतर मनपाने कारवाई केली खरी, परंतु त्यानंतर पुन्हा बाजार उभा राहत असताना मात्र प्रशासन सोयीने दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप करणाऱ्या माजी नगरसेवक दिलीप दातीर यांनी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना अवमान याचिका पूर्व नोटीस बजावली आहे.

आयुक्तांना अवमान याचिका पूर्व नोटीस
नाशिक : उच्च न्यायालयाने भंगार बाजार हटविण्याचे आदेश दिल्यानंतर मनपाने कारवाई केली खरी, परंतु त्यानंतर पुन्हा बाजार उभा राहत असताना मात्र प्रशासन सोयीने दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप करणाऱ्या माजी नगरसेवक दिलीप दातीर यांनी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना अवमान याचिका पूर्व नोटीस बजावली आहे.
सोमवारी (दि.११) दातीर यांनी आयुक्त गमे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन नोटीस बजावली आहे. न्यायालयाने १७ जानेवारी रोजी सातपूर-अंबड लिंकरोडवरील बेकायदेशीर भंगार बाजार हटविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर महापालिकेने यांसदर्भात कार्यवाहीदेखील केली. परंतु त्यानंतर पुन्हा हा बाजार वसला असून त्यांना हटविण्यासाठी दातीर यांनी पाठपुरावा केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आधी बाजार हटविण्याची तयारी करण्यात आली होती. त्यामुळे अनेक व्यावसायिकांनी आपले साहित्य उचलून नेले होते. मात्र, पोलीस आणि महापालिकेनेच माघार घेतली.
अनेक विक्रेत्यांनी व्यवसाय नियमिततेसाठी महापालिकेने अर्ज केल्याचे नगररचना विभागाचे म्हणणे आहे, तर पोलिसांनीदेखील सणावाराचे निमित्त करून कारवाईसाठी बंदोबस्त करण्यास टाळाटाळ केली होती. त्यानंतर हा विषय मागे पडला.
मुळात उच्च न्यायालयाने बेकायदेशीर भंगार बाजार हटवावा तसेच संबंधितांचे साहित्य जप्त करून ते नेट्ट करावे. तसेच शहराबाहेर व्यवसाय करण्यास प्रवृत्त करावे अशा प्रकारचे निर्देश दिला आहे. मात्र त्यानंतरदेखील प्रशासन दखल घेऊन कारवाई करीत नसल्याने महापालिकेच्या विरोधात अवमान याचिका का दाखल करू नये अशा आशयाची नोटीसच बजावल्याचे दातीर यांनी सांगितले.