सिन्नर टॅलेंट सर्च परिक्षेतील गुणवंतांचा गौरव
By Admin | Updated: September 21, 2015 22:50 IST2015-09-21T22:49:40+5:302015-09-21T22:50:16+5:30
उज्वल निकम : जीवनात यशस्वी होण्यासाठी मनाला साक्षीदार बनवा

सिन्नर टॅलेंट सर्च परिक्षेतील गुणवंतांचा गौरव
सिन्नर : अतिरेकी स्वप्ने पाहून जीवनात यश मिळत नाही. नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत सर्व प्रकारचे खटले चालवितांना विविध अनुभव घेतले. नेता असो किंवा अभिनेता खोटी गांधीगिरी करुन पाप धुतले जात नाही. त्यामुळे जीवनात यशस्वी होण्यासाठी मनाला साक्षीदार बनवा असा सल्ला राज्याचे विशेष सरकारी वकील अँड. उज्वल निकम यांनी दिला.
सिन्नर पोलीस ठाणे, लायन्स क्लब, साहस ग्रुप व सह्याद्री युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सिन्नर टॅलेंट सर्च परिक्षेतील विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ येथील मातोश्री नर्मदा लॉन्स येथे पार पडला. सहकार व पणन राज्यमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून अँड. निकम बोलत होते. आमदार राजाभाऊ वाजे, लायन्स क्लबचे अध्यक्ष कृष्णा भगत, उद्योजक पुंजाभाऊ सांगळे, नगराध्यक्ष आश्विनी देशमुख, हेमंत वाजे, उदय सांगळे, पोलीस निरीक्षक किशोर नवले, प्रशांत दिवे यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. परिक्षेतील विविध गटातील यशस्वी विद्यार्थ्यांना निकम, भुसे व वाजे यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
जगात भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ असल्याचे सांगून शाळेत सदगुण शिकविले जात नाही. चौफेर लक्ष ठेवून ते मिळवावे लागतात. असे काम करणारेच आयुष्यात यशस्वी होतात असे त्यांनी सांगितले. जोपर्यंत कठोर परिश्रम केले जात नाही तोपर्यंत कोणीही यशस्वी होत नसल्याचे अँड. निकम म्हणाले. सिन्नर टॅलेंट सर्च हा उपक्रम मालेगाव मध्ये सुरु करणार असल्याची घोषणा करून विद्यार्थ्यांना कलागुण दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देणार्या समितीचे भुसे यांनी आभार मानले. जबाबदारी निष्ठेने पार पाडली तर परमेश्वरालाही यश द्यावे लागते असेही ते म्हणाले. उदय सांगळे, हेमंत वाजे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्तविक कृष्णा भगत यांनी केले.(वार्ताहर)