जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 23:10 IST2022-03-07T23:08:17+5:302022-03-07T23:10:44+5:30
नाशिक : जिल्ह्यातील बागलाण, दिंडोरी, पेठसह काही भागांत सोमवारी (दि.७) सायंकाळी बेमोसमी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली, तर कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अंबासन येथे वीज कोसळून बैल ठार झाला.

जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी
नाशिक : जिल्ह्यातील बागलाण, दिंडोरी, पेठसह काही भागांत सोमवारी (दि.७) सायंकाळी बेमोसमी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली, तर कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अंबासन येथे वीज कोसळून बैल ठार झाला.
नामपूरला वीज पुरवठा खंडित
नामपूर : बागलान तालुक्यातील १६ गाव काटवन परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे नामपूर व टेंबे सब स्टेशनवरील वीज पुरवठा काही तास खंडित करण्यात आला होता. मात्र, शेतकऱ्यांची या अवकाळी पावसामुळे तारांबळ उडाली. यामुळे कांदा पिकावर मोठ्या प्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. नामपूरसह अंबासन, काकडगाव, बिजोरसे, इजमाने, खालचे टेंभे, वरचे टेंबे, द्याने, उत्राने, कुपखेडा आदी भागातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. अंबासन येथे वाघखोर शिवारातील शेतकरी त्र्यंबक कोंडाजी कोर यांच्या बैलावर वीज कोसळल्याने बैल जागीच ठार झाला.
लखमापूरला पाऊस
लखमापूर : परिसरात अगोदर जोरदार वारे वाहून नंतर पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे सोंगणीला आलेला गहू जोराच्या वाऱ्याने आडवा पडल्याने बळीराजा हतबल झाला आहे. त्यामुळे सोंगणीला मोठ्या प्रमाणावर आडकाठी येण्याची शक्यता आहे. द्राक्षे काढणी सुरू असताना अचानक वातावरण बदलल्याने शेतकरी वर्गाची मोठ्या प्रमाणावर धावपळ उडाली. लखमापूर, दिंडोरी, करंजवण, अक्राळे, तळेगाव, परमोरी, दहेगाव आदी परिसरात पावसाने हजेरी लावली.
मनमाडला कांदा पोळी भिजल्या
मनमाड : हवामान खात्याच्या अंदाजानुसार रात्री आठ वाजेच्या सुमारास मनमाडसह परिसरातील ग्रामीण भागात बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी राजाची एकच धावपळ उडाली. सकाळपासूनच ढगाळ वातावरण आणि सोसाट्याचा वारा सुटला होता. त्यामुळे शेतकरी वर्गात धास्ती निर्माण झाली होती; परंतु रात्री पाऊस आल्याने एकच धावपळ उडाली. काही शेतकऱ्यांच्या मका व कांदे काढून शेतात असलेल्या कांदा पोळी भिजल्या.