शिर्डीत प्रार्थना केली अन् कोल्हापुरात गावं बुडाली नाही; दीपक केसरकर यांचं विधान, विनायक राऊत, भुजबळांकडून टोलेबाजी
By संजय पाठक | Updated: July 30, 2023 18:35 IST2023-07-30T18:34:54+5:302023-07-30T18:35:17+5:30
महाराष्ट्रातील मंत्रीच अशाप्रकारचे विधान करू शकतात असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी लगावला आहे.

शिर्डीत प्रार्थना केली अन् कोल्हापुरात गावं बुडाली नाही; दीपक केसरकर यांचं विधान, विनायक राऊत, भुजबळांकडून टोलेबाजी
नाशिक - ही श्रध्दा म्हणा की अंधश्रध्दा अथवा योगायोग परंतु मी शिर्डीत होतो, तिकडे कोल्हापूरात राधानगरीचे दरवाजे उघडले, पण यंदा पाच फुट पाणी येऊन सुध्दा गावे पाण्याखाली बुडाले नाही, शेवटी प्रार्थनेत एक शक्ती असतेच असे विधान राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले. त्यामुळे नाशिकमध्येच त्याच्या तीव्र प्रतिक्रीया उमटल्या आहेत.
महाराष्ट्रातील मंत्रीच अशाप्रकारचे विधान करू शकतात असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी लगावला आहे. शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर हे रविवारी (दि.३०) नाशिक दौऱ्यावर होते. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले. दीपक केसरकर यांनी गंमतीचा भाग म्हणा किंवा श्रध्दा- अंधश्रध्दा म्हणा, ज्या दिवशी पूराची स्थिती होती.
कोल्हापूरमध्ये राधानगरी धरणातून पाणी सोडल्यानंतर नदीची पाच फुटाने लेव्हल वाढते, यावेळी एक फुटाने देखील लेव्हल वाढली नाही, ही वस्तुस्थिती आहे, तुम्ही खात्री करू शकता, असे सांगितले. दरम्यान, केसरकर यांच्या विधानावर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी माझ्या प्रार्थनेमुळे कोल्हापूरला पूर आला नाही असे सांगण्याचा मूर्खपणा केवळ महाराष्ट्रातील मंत्रीच करू शकतो इतर कोणी नाही असा टोला लगावला आहे.
मणिपूरबाबतही केसरकर यांनी प्रार्थनाकरावी तसेच आपल्या मतदार संघातील गावे पाण्यात बुडू नये यासाठी देखील केसरकर यांनी प्रार्थना करावी असे राऊत म्हणाले. नाशिकचे माजी पालकमंत्री आणि सध्या राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही केसरकर यांनी नाशिकमधील धरणे भरण्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी, असा टोला लागवला.