‘तिला’ वाचवण्यासाठी प्रबोधनाचा जागर...
By Admin | Updated: October 13, 2015 23:18 IST2015-10-13T23:14:42+5:302015-10-13T23:18:02+5:30
‘तिला’ वाचवण्यासाठी प्रबोधनाचा जागर...

‘तिला’ वाचवण्यासाठी प्रबोधनाचा जागर...
कोणी बलात्कार झाल्याने, तर कोणी प्रेमभंग झाल्याने आत्महत्त्या करीत असल्याच्या घटना पाहून, ऐकून ‘त्यांनी’ निश्चय केला - ‘तिला वाचवायचंय...’ मग वर्गावर्गांत सुरू झाला प्रबोधनाचा जागर... त्यातून अनेक युवतींना जगण्याची ऊर्जा तर मिळालीच; पण कित्येकांच्या मनात आशेचे नवे दिवेही प्रज्वलित झाले...
- हे वर्णन आहे येवल्याच्या प्रांताधिकारी वासंती माळी यांचे. मूळ सांगलीच्या असलेल्या माळी सन २०११ पासून शासकीय नोकरीनिमित्त नाशिक जिल्ह्यात आल्या. या काळात त्यांच्यासमोर महिलांच्या आत्महत्त्येची अनेक प्रकरणे आली. जन्मापासून मरेपर्यंत महिलांची होणारी हेळसांड, त्यांना पार पाडावी लागणारी दिव्ये पाहून माळी व्यथित झाल्या. याच काळात त्यांच्या स्वत:च्या वहिनीनेही आत्महत्त्या केली. तेव्हा मात्र त्यांनी महिला आत्महत्त्या रोखण्यासाठी पाउल उचलण्याचा निश्चय केला. असेच एकदा येवल्याच्या जनता विद्यालयात त्यांना एका कार्यक्रमासाठी बोलावण्यात आले असता, तेथे भाषण करताना त्यांनी मुलींसाठी काही मुद्दे मांडले; पण तेव्हा मुलांचीही उपस्थिती असल्याने बऱ्याच मुद्द्यांना त्यांना स्पर्श करता आला नाही. त्यामुळे यापुढे फक्त मुलींनाच व्याख्यान द्यायचे आणि चार गोष्टी समजावून सांगायच्या, असे त्यांनी ठरवून टाकले. येवल्याच्या एसएनडीटी महाविद्यालयात त्यांचे पहिले स्वतंत्र व्याख्यान झाले. ते ऐकून मुली अक्षरश: भारावल्या. हा प्रतिसाद पाहून माळी यांचा उत्साह दुणावला. तेव्हापासून त्या जिल्ह्यात ठिकठिकाणच्या महाविद्यालयांत जाऊन अकरावीच्या पुढच्या वर्गांतील विद्यार्थिनींशी दीड तास संवाद साधतात. स्वत:ला कमी लेखू नका, न्यूनगंड बाजूला सारा, माणसांच्या नजरा आणि स्पर्श ओळखा, संभाव्य धोकेदायक व्यक्तींपासून अंतर राखा, हे त्या तळमळीने सांगतात. महाविद्यालयीन जीवनात प्रेम करा; पण व्यवहारीही व्हा, आपण ज्याच्यावर प्रेम करतोय, तो खरोखर त्या योग्यतेचा आहे की नाही, हेसुद्धा समजून घ्या, असा सल्ला त्या मुलींना देतात. जगात अनेकांना आपल्यापेक्षा कित्येक पटीने अधिक दु:खे असूनही ती त्यावर मात करीत जगत असल्याची अनेक उदाहरणेही त्या देतात. एका व्याख्यानानंतर तर हलाखीच्या परिस्थितीमुळे आपल्या आईनेच सगळ्या भावंडांना विष देऊन मारण्याचा कसा प्रयत्न केला, हे एका विद्यार्थिनीने ओक्साबोक्शी रडत सांगितले; पण काहीही झाले तरी आपण आता जगणार असल्याचे अभिवचन या मुलीने दिले, तेव्हा माळी यांना उपक्रमाचे सार्थक झाल्यासारखे वाटले. माळी यांचे हे काम भले लहानसे असले, तरी ते कोणाचे तरी आयुष्य सावरणारे ठरत आहे.