पोल्ट्री शेड कायम : वाढीव मूल्यांकनाचे प्रयत्न जोरात समृद्धीच्या मोजणीत उपग्रह नकाशांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 00:51 IST2018-02-11T00:51:03+5:302018-02-11T00:51:36+5:30
नाशिक : समृद्धी महामार्गासाठी जमीन देताना वाढीव मोबदला मिळावा यासाठी शेतकºयांनी पडीक जमिनी सुपीक करण्याबरोबरच जागेवर पोल्ट्री शेड उभारून मूल्यांकन वाढविण्यासाठी चालविलेल्या प्रयत्नांना आळा घालण्यासाठी उपग्रहाद्वारे नकाशे गोळा करण्याचे ठरविले.

पोल्ट्री शेड कायम : वाढीव मूल्यांकनाचे प्रयत्न जोरात समृद्धीच्या मोजणीत उपग्रह नकाशांची प्रतीक्षा
नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जमीन देताना वाढीव मोबदला मिळावा यासाठी शेतकºयांनी पडीक जमिनी सुपीक करण्याबरोबरच जागेवर पोल्ट्री शेड उभारून मूल्यांकन वाढविण्यासाठी चालविलेल्या प्रयत्नांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने उपग्रहाद्वारे जमिनींचे नकाशे गोळा करण्याचे ठरविले असले तरी, महिना उलटूनही त्यात यश आलेले नाही. उलटपक्षी सिन्नर तालुक्यात ज्या ज्या गावांमध्ये प्राथमिक मोजणी झालेली आहे अशा गावांमध्ये शेडच्या संख्येत वाढ होण्याबरोबरच ते अधिकृत करून घेण्याच्या प्रयत्नांना गती आली आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी व सिन्नर या दोन तालुक्यांतील ४९ गावांतील सुमारे १२०० हेक्टर जमीन संपादित करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. प्रारंभी या महामार्गासाठी जमिनी देण्यास विरोध करणाºया शेतकºयांनी नंतर मात्र जमिनीला पाचपट मोबदला मिळत असल्याचे पाहून संमती देण्यास सुरुवात केली असून, त्यातूनच आजवर सुमारे ५४ टक्के जमिनीचे संपादन थेट खरेदीद्वारे करण्यात आले आहे. शासनाकडून जमिनीच्या मोबदल्याबरोबरच शेतकºयांच्या शेतातील घर, गोठा, झाडे, विहीर, पाइपलाइन आदी गोेष्टींचेही मूल्यांकन करून त्याचीही वेगळी भरपाई दिली जात असल्याचे पाहून सिन्नर तालुक्यातील मालढोण, पाथरे, वारेगाव, शिवडे आदी गावांतील काही शेतकºयांनी पडीक जमिनीला रातोरात बागायती करण्याबरोबरच शेतात पाइपलाइन टाकल्या आहेत, तर काहींनी पोल्ट्री शेड उभारले आहेत. त्यासाठी काही एजंट शेतकºयांच्या भेटी घेऊन त्यांना वाढीव मोबदला मिळवून देण्याचे आमिष दाखवून आपले कमिशन काढण्याचा उद्योग करीत आहेत. या संदर्भात ‘लोकमत’ने दोन महिन्यांपूर्वी सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते, त्यावर प्रशासनानेही या वृत्तास दुजोरा देत समृद्धी मार्गावरील जमिनींचे उपग्रहाद्वारे जुने नकाशांचा आधार घेऊनच शेतकºयांना मोबदला देण्याचे जाहीर केले होते. महाराष्टÑ रस्ते विकास महामंडळाने या कामासाठी ‘मोनार्च’ या खासगी कंपनीची या कामी नेमणूक केली असून, प्रशासनाने या कंपनीशी संपर्क करून सिन्नर तालुक्यातील संबंधित गावांचे नकाशे उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या.