महापौरांच्याच प्रभागात सभापतींनी बुजवले खड्डे

By Admin | Updated: August 6, 2014 00:39 IST2014-08-05T23:42:02+5:302014-08-06T00:39:13+5:30

महापौरांच्याच प्रभागात सभापतींनी बुजवले खड्डे

The potholes created by the chairmanship of the mayor | महापौरांच्याच प्रभागात सभापतींनी बुजवले खड्डे

महापौरांच्याच प्रभागात सभापतींनी बुजवले खड्डे

 

नाशिक : पावसामुळे शहरात विविध भागांत पडलेल्या खड्ड्यांमुळे टीका सुरू होताच मनसेचे स्थायी समिती सभापती राहुल ढिकले यांनी अचानक खड्डे पाहणी मोहीम हाती घेतली आणि मनसेच्याच महापौरांच्या प्रभागातील खड्डे बुजविल्याने हा चर्चेचा विषय ठरला. सोमवारीच महापौरांनी खड्डे बुजविण्याचे आदेश प्रशासनाला दिले असताना, पाठोपाठ सभापती ढिकले यांनी दौरा करून थेट महापौरांचाच प्रभाग गाठल्याने मनसेतील सुंदोपसुंदी अधिकच वाढली असल्याचे स्पष्ट झाले.
गेल्या वर्षी शहराच्या विविध भागांत पडलेले खड्डे हा टीकेचा विषय ठरला होता. शिवसेनेने तर खड्ड्यांवरून लांब उडी मारण्याचे अभिनव आंदोलन केले. तशीच स्थिती दिसत असताना महापौरांनी सोमवारी माध्यमांना खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाला आदेश दिले असल्याचे सांगितले आणि मंगळवारी लगोलग स्थायी समिती सभापती राहुल ढिकले यांनी पाहणी दौरा केला. या दौऱ्यात अधिकारी आणि नगरसेवक होतेच; शिवाय खड्डे बुजवणारी यंत्रणाही होती. मालेगाव स्टॅँड येथे ताफा पोहचताच तेथे असलेले खड्डे तातडीने बुजविण्याचे आदेश सभापतींनी दिले. त्याबरहुकूम डांबर मिश्रण टाकून खड्डे बुजवले गेले. त्यानंतर पेठरोड, दिंडोरीरोड अशा विविध भागांत, तारवालानगर येथेदेखील विविध विभागांत खड्डे बुजविण्यात आले. अशाच प्रकारे विविध भागांत भेटी दिल्यानंतर महापौरांच्या प्रभागात अशोकस्तंभ येथे ते पोहोचले तेव्हा नगरसेवक सुरेखा भोसले आणि अन्य कार्यकर्ते तेथे होते. तेथील खड्डे बुजवल्यानंतर संदीप हॉटेलजवळ खड्डे बुजवून हा दौरा संपला. तथापि, महापौरांच्या प्रभागात जाऊन स्थायी समिती सभापतींना खड्डे बुजवण्याकडे लक्ष द्यावे लागले हा चर्चेचा विषय ठरला.
या दौऱ्यात नगरसेवक यशवंत निकुळे, गणेश चव्हाण यांच्या बरोबरच कार्यकारी अभियंता पी. बी. चव्हाण, उपअभियंता सी. बी. अहेर, एस. एस. रौंदळ, आर. एस. पाटील, प्रशांत पगार, विभागीय अधिकारी अशोक वाघ, जयश्री सोनवणे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The potholes created by the chairmanship of the mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.