महापालिकेच्या स्वायत्ततेला धोका ठरण्याची शक्यता?
By Admin | Updated: April 30, 2017 02:12 IST2017-04-30T02:12:00+5:302017-04-30T02:12:09+5:30
नाशिक : ‘स्मार्ट सिटी’ अभियानांतर्गत एसपीव्ही ही कंपनी महापालिकेच्या स्वायत्ततेला आव्हान देणारी असल्याची भीती महासभेत सदस्यांनी यापूर्वी व्यक्त केली होती

महापालिकेच्या स्वायत्ततेला धोका ठरण्याची शक्यता?
नाशिक : ‘स्मार्ट सिटी’ अभियानांतर्गत स्थापन झालेली एसपीव्ही अर्थात स्पेशल परपज व्हेइकल ही कंपनी महापालिकेच्या स्वायत्ततेला आव्हान देणारी असल्याची भीती महासभेत काही अभ्यासू सदस्यांनी यापूर्वी व्यक्त केली होती. ही भीती आता खरी ठरण्याच्या दृष्टीने कंपनीची पावले पडत असून, शनिवारी (दि.२९) झालेल्या बैठकीत महापालिकेला उत्पन्नवाढीसाठी अप्रत्यक्षपणे रेटा वाढविला आहे.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानात नाशिकचा समावेश झाल्यानंतर त्यासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या एसपीव्हीला मागील पंचवार्षिक काळात महासभेत सदस्यांनी तीव्र विरोध दर्शविला होता. त्यावेळी तत्कालीन उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी अभ्यासपूर्ण मांडणी करत सदर एसपीव्ही अर्थात कंपनीकरण हे महापालिकेच्या स्वायत्ततेलाच आव्हान देणार असल्याची भीती व्यक्त केली होती. त्याचे संकेत आता मिळू लागले आहेत. स्मार्ट सिटीसंदर्भात नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनची बैठक सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना कुंटे यांनी सदर बैठकीत महापालिकेला काही बाबींमध्ये सुधारणा सुचविण्यासाठी अभ्यास होण्याची गरज व्यक्त केली. त्यात प्रामुख्याने, महापालिकेने मालमत्ता दरात सुधारणा करणे आवश्यक असून, त्याबाबतचे दर निश्चित केले पाहिजे. तसेच महापालिकेला प्राप्त होणाऱ्या जाहिरात करातही सुधारणा होण्यासाठी अभ्यास होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. म्युनिसिपल बॉण्ड काढण्याचीही सूचना त्यांनी केली. ज्या पाण्याचा हिशेब लागत नाही, त्याबाबत सर्वेक्षण करून त्याचा अहवाल स्मार्ट सिटी कंपनीच्या पुढील बैठकीत ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी महापालिका प्रशासनाला दिल्याचे सांगितले. उत्पन्नवाढीसाठी महापालिकेने सुधारणा न केल्यास केंद्र व राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधीवर परिणाम होऊ शकतो,
असा सूचक इशाराही कुंटे यांनी
दिला. त्यामुळे उत्पन्नवाढीसाठी कंपनीकडून रेटा वाढणार असून परिणामी, भविष्यात करवाढीचे संकेत मिळत आहेत. कंपनीकडून महापालिकेच्या स्वायत्ततेला कोणताही धोका उत्पन्न होणार नाही, असे एसपीव्ही स्थापन करताना स्पष्ट करण्यात आले होते. परंतु, आता महासभेच्या अधिकारांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)