मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्यासासाठी जाणारे कार्यकर्ते ताब्यात
By Admin | Updated: February 22, 2015 00:28 IST2015-02-22T00:28:04+5:302015-02-22T00:28:28+5:30
मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्यासासाठी जाणारे कार्यकर्ते ताब्यात

मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्यासासाठी जाणारे कार्यकर्ते ताब्यात
नाशिक : पुरोगामी विचारांचे डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांच्या पाठोपाठ कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याकांडाने पुरागामी चळवळीतील कार्यकर्ते संतप्त झाले. त्याचे तीव्र पडसाद उमटले. मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यातच गो बॅकचे नारे देणाऱ्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तालयाच्या नुतन इमारतीच्या उदघाटनासाठी येऊन फडणवीस यांना जाब विचारण्यासाठी प्रयत्न केला. तथापि, पोलीसांनी कार्यकर्त्यांनी सौम्य बळाचा वापर करून आंदोलकांना अडकवले. आणि झटापट करून संबंधीतांना ताब्यात घेऊन पंचवटी पोलीस ठाण्यात नेल्याने पुढिल संघर्ष टळला.
हल्लेखोरांच्या गोळीबारात जखमी झालेले कॉम्रेड पानसरे यांचे शुक्रवारी रात्री निधन झाल्यानंतर शनिवारी सकाळी त्याचे तीव्र पडसाद उमटले. दाभोळकर यांच्या हल्लेखोरांपर्यंत पोलीस पोहोचू शकलेले नाहीत.या हल्लेखोरांचा शोध व अटकेच्या मागणीसाठी डावी आघाडी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती व पुरोगामी विचाराच्या विविध संघटना व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन शनिवारी हुतात्मा स्मारकापासून मोर्चा काढला़ शिवाजीरोडवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री परत जा अशा घोेषणा दिल्या. कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला आणि ते मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्यासाठी पोलीस आयुक्तालयाकडे रवाना झाले. तथापि, पोलीसांनी मुख्यमंत्री येण्याच्या आतच धावपळ केली. मुख्यमंत्री, महाराष्ट्र सरकार व पोलिसांच्या निषेधार्थ घोषणाबाजी, तसेच काळे झेंडे दाखविणाऱ्या कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमार करीत पोलिसांनी ३० जणांना ताब्यात घेतले़ आणि मुख्यमंत्र्याचा कार्यक्रम सुरळीत पार पडल्यानंतर सोडून दिले.
तत्पुर्वी ‘दाभोलकर-पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अटक करा, महाराष्ट्र पोलीस मुर्दाबाद, मुख्यमंत्री राजीनामा द्या, धर्मवाद हो बरबाद, धर्म के नाम पर रक्तपात नही चलेगा’ अशी घोषणाबाजी करीत हुतात्मा स्मारकापासून हा निषेध मोर्चा निघाला़ डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांची २० आॅगस्ट २०१३ यांची हत्त्या करण्यात आली. या हत्त्येस अठरा महिने उलटूनही हल्लेखोरांचा तपास लागलेला नाही़ याबरोबरच कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरही गोळ्या झाडून त्यांचा खून करण्यात आला़ मात्र अद्यापही या दोघांचे मारेकरी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत़ या दोन्ही हल्ल्यांमध्ये साम्य असून धर्मांध, प्रतिगामी, सनातन प्रवृत्ती यांचा सखोल तपास करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी यावेळी कार्यकर्ते करीत होते़ या मोर्चामध्ये डाव्या आघाडीचे अॅड़ तानाजी जायभावे, अॅड़ मनीष बस्ते, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महेंद्र दातरंगे, कृष्णा चांदगुडे, लक्ष्मीकांत कावळे, ‘आप’चे जितेंद्र भावे, प्रा़ इंदिरा आठवले, शशी उन्हवणे, शांताराम चव्हाण, प्रियदर्शन भारतीय यांच्यासह सुमारे पन्नास ते साठ कार्यकर्ते सहभागी झाले होते़