सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सव्वाशे एकर जागेचा ताबा
By Admin | Updated: January 18, 2015 02:05 IST2015-01-18T02:01:26+5:302015-01-18T02:05:59+5:30
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सव्वाशे एकर जागेचा ताबा

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सव्वाशे एकर जागेचा ताबा
नाशिक : तपोवन सोडून अन्यत्र जाण्यास साधु-महंतांचा विरोध, तर साधुग्रामसाठी जागा अधिग्रहीत करण्यास जागामालक शेतकऱ्यांची आडकाठी त्यामुळे कुंभमेळ्यापूर्वी साधुग्रामचा तिढा सुटतो की नाही यावरून चिंतित असलेल्या जिल्हा प्रशासनाला हायसे वाटले असून, नाशिक तहसीलदारांनी ९७ शेतकऱ्यांकडील जवळपास सव्वाशे एकर जागेचा शनिवारी ताबा घेऊन तो महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधु-महंतांनी तपोवनात साधुग्रामची निर्मिती केली जावी, येथील जागांवर झालेले अतिक्रमण उद््ध्वस्त करावे अशा मागण्या करून तपोवनात सुमारे साडेतीनशे एकर जागा मिळावी यासाठी सरकारवर व पर्यायाने प्रशासनावर दबाव टाकण्यास सुरुवात केली होती, तर दुसरीकडे तपोवनातील जागा बाजारभावाप्रमाणे शासनाने कायमस्वरूपी संपादित कराव्यात, अशी मागणी जागामालक शेतकऱ्यांनी करून, त्याबाबत थेट मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्यामुळे मोठा तिढा निर्माण झाला होता. प्रशासनाने तपोवनात साधुग्रामसाठी जागा न मिळाल्यास पर्यायी जागांचा शोध घेण्यास व त्यासाठी साधु-महंतांना राजी करण्याचाही प्रयत्न एकीकडे चालविला असताना, दुसरीकडे शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देऊन जागा अधिग्रहीत करण्याबाबत नोटिसाही बजावल्या होत्या.
डिसेंबर अखेर तपोवनातील जागा अधिग्रहीत करून ती महापालिकेच्या ताब्यात देण्याची व मार्चपर्यंत त्या जागेवर साधुग्राम साकारण्याची मुदतही देण्यात आली होती. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून न्यायालयीन वादात हा प्रश्न सापडल्याने प्रशासन चिंतित झाले होते. त्यातूनच अकरा महिन्यांसाठी भाडेतत्त्वावर जागा अधिग्रहीत करण्याची व प्रसंगी एकतर्फी ताबा घेण्याची तयारी प्रशासनाने करून मोबदल्याची रक्कमही वाढून दिली होती. त्याला जागामालक शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
जागामालक शेतकऱ्यांना येत्या पंधरा दिवसांत ६० टक्के रक्कम देण्यात येणार असून, उर्वरित रक्कम एप्रिल महिन्यात अदा केली जाणार आहे. साधुग्रामसाठी जागा ताब्यात मिळाल्याने प्रशासनाला हायसे वाटले असून, सोमवारी महापालिकेकडे ही जागा हस्तांतरित करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)