आदिवासी विकासमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा, आज उपोषण संपणार? सातव्या दिवशीही ‘बिऱ्हाड’ कायम
By Admin | Updated: March 4, 2015 01:15 IST2015-03-04T01:12:33+5:302015-03-04T01:15:03+5:30
आदिवासी विकासमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा, आज उपोषण संपणार? सातव्या दिवशीही ‘बिऱ्हाड’ कायम

आदिवासी विकासमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा, आज उपोषण संपणार? सातव्या दिवशीही ‘बिऱ्हाड’ कायम
नाशिक : महाराष्ट्र राज्य तासिका / मानधन शिक्षक स्त्री अधिक्षिका वर्ग-४ कर्मचारी संघटनेचे गेल्या सहा दिवसांपासून आंदोलन सुरूच असून, काल (दि.३) सातव्या दिवशीही कायम होते. दरम्यान, काल (दि.३) दुपारी आंदोलनकर्त्यांच्या एका शिष्टमंडळाची आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून, बुधवारी (दि.४) यासंदर्भात लेखी आश्वासन मिळताच हे बेमुदत आंदोलन मागे घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या सहा दिवसांपासून या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आदिवासी विकास विभागासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. त्यांना मंगळवारी (दि.३) आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा यांच्यासोबत चर्चा करण्याबाबत विभागाने लेखी कळविले होते. त्यानुसार आंदोलनकर्त्यांचे एक शिष्टमंडळ काल सकाळीच मुंबईला रवाना झाले. मंत्रालयात आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा यांच्यासह प्रधानसचिव राजगोपाल देवरा व प्रशासन अधिकारी संतोष ठुबे आदिंशी शिष्टमंडळातील एस. पी. गावित, केशव ठाकरे, बबीता पाडवी, सुनीता तडवी, संदीप भाबड, रितेश ठाकूर, भगतसिंग पाडवी, कमलाकर पाटील आदिंनी चर्चा केली. त्यात विष्णु सावरा यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबत शासनाचा सकारात्मक विचार असून, त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव दुसऱ्यांदा ठेवल्याचे सांगितले. तसेच अतिदुर्गम भागात आपण काम करतात याची जाणीव असून, आपल्याला स्थानिक भाषाही अवगत असल्याने आपलाच विचार करण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे शिष्टमंडळ रात्री उशिरा नाशिकला परतले. बुधवारी (दि.४) यासंदर्भात लेखी आश्वासन मिळाल्यानंतर उपोषण मागे घेण्यात येणार असल्याचे कळते. मात्र काल सातव्या दिवशीही बिऱ्हाड आंदोलन सुरूच होते. (प्रतिनिधी)