पाच वर्षांत लोकसंख्या ९८ लाख
By Admin | Updated: July 29, 2016 01:22 IST2016-07-29T01:19:56+5:302016-07-29T01:22:30+5:30
आरोग्याधिकाऱ्याचे अजब तर्कट : घंटागाडीचा सदोष प्रस्ताव

पाच वर्षांत लोकसंख्या ९८ लाख
नाशिक : सन २०११ च्या जनगणनेनुसार नाशिकची लोकसंख्या १४ लाख ८५ हजार इतकी नोंदविली गेली आहे आणि आजच्या घडीला शहराची लोकसंख्या अंदाजे १८ लाखांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. लोकसंख्येचा दर लक्षात घेता पाच वर्षांत फार, तर शहराची लोकसंख्या ३५ ते ४० लाखावर जाऊ शकेल परंतु महापालिकेच्या आरोग्याधिकाऱ्याने घंटागाडीच्या ठेक्याचा प्रस्ताव तयार करताना शहराची लोकसंख्या पाच वर्षांत तब्बल ९८ लाखांवर जाऊन पोहोचणार असल्याचे अजब तर्कट मांडले असून त्याच आधारे कचरा संकलनाची आकडेवारी काढत घंटागाडीचा सदोष प्रस्ताव तयार केला आहे. आता असे तर्कट मांडण्यात आरोग्याधिकाऱ्याचे गणित कच्चे आहे की त्यापाठीमागे वेगळेच ‘गणित’ आहे याची खमंग चर्चा महापालिका वर्तुळात चर्चिली जात आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने पाच वर्षांच्या कालावधीसाठी तब्बल १७६ कोटी रुपयांचा घंटागाडीच्या ठेक्याचा प्रस्ताव तयार केला असून, तो स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. सदर घंटागाडी ठेक्याच्या मूळ प्रस्तावात आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी प्राप्त निविदादरानुसार ५ वर्षांकरिता अपेक्षित खर्च ढोबळपणे मांडला आहे. त्यात सहाही विभागातील लोकसंख्या गृहित धरून पाच वर्षांत किती टन कचरा संकलन होऊ शकेल याचीही अंदाजे आकडेवारी देण्यात आली आहे. परंतु अंदाज वर्तवतानाही त्यात वास्तवाला स्पर्श न करण्याचा पराक्रम आरोग्याधिकाऱ्याने केला आहे. आरोग्याधिकाऱ्यांनी प्रस्तावात पाच वर्षांनंतर नाशिक पूर्व विभागाची लोकसंख्या १६ लाख ६९ हजार ७३०, पश्चिम विभागाची १३ लाख ४५ हजार ३५८, पंचवटी विभागाची १९ लाख २४ हजार २६५, नाशिकरोड विभागाची १८ लाख २५ हजार ६६५, सिडको विभागाची १७ लाख ३२ हजार ३७५ आणि सातपूर विभागाची १३ लाख ६४ हजार १५ याप्रमाणे लोकसंख्या होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे, तर सहाही विभागांत सर्वसाधारणपणे पाच वर्षांत घनकचरा सुमारे ११ लाख टन इतका संकलित होणार असल्याचे म्हटले आहे. या आकडेवारीवरूनच दराची निश्चिती करण्यात आलेली आहे. पाच वर्षांत शहराची लोकसंख्या ९८ लाख ६१ हजार होण्याचा अंदाज आरोग्याधिकाऱ्याने वर्तविल्याने नाशिककरांचे डोळे पांढरे होण्याची वेळ येऊन ठेपेल.
आरोग्याधिकाऱ्यांनी प्रस्ताव तयार करताना आजच्या लोकसंख्येला पाचने गुणले आणि लोकसंख्या ९८ लाखांवर नेऊन पोहोचविली. त्यामुळे संपूर्ण प्रस्तावच सदोष झाला. महापालिकेच्या आरोग्याधिकाऱ्याने लोकसंख्या वाढीचे अजब तर्कट मांडत शासनाच्या आरोग्यविभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या कुटुंब नियोजन संकल्पनेचा ‘कचरा’केल्याची रंजक चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.