नाशिक बाजार समितीसाठी ९४ टक्के शांततेत मतदान

By Admin | Updated: July 27, 2015 00:03 IST2015-07-27T00:03:22+5:302015-07-27T00:03:35+5:30

४२४४ इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

Polling for 94 percent of Nashik Market Committee | नाशिक बाजार समितीसाठी ९४ टक्के शांततेत मतदान

नाशिक बाजार समितीसाठी ९४ टक्के शांततेत मतदान

नाशिक : नाशिकसह त्र्यंबकेश्वर व पेठ तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शांततेत पार पडलेल्या मतदानात सरासरी ९४ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जी. जी. मावळे यांनी दिली. नाशिक, त्र्यंबकेश्वर व पेठ तालुक्यांतील १५ ठिकाणी ३१ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. बाजार समितीवरील वर्चस्वासासाठी शेतकरी पॅनल, आपलं पॅनल आणि परिवर्तन पॅनलमध्ये ही लढत झाली. ३१ मतदान केंद्रांवर ४५३५ मतदारांपैकी ४२४४ इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
सोमवारी (दि.२७) सार्वजनिक बांधकाम विभागातील गोदावरी हॉल येथे सकाळी ८ वाजेपासून १४ टेबलवर मतमोजणी होईल. दुपारपर्यंत हे चित्र स्पष्ट होऊ शकेल. बाजार समितीसाठी माजी खासदार देवीदास पिंगळे, खासदार हेमंत गोडसे व शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांचं आपलं पॅनल, माजीमंत्री बबनराव घोलप, महापालिका स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे यांचं शेतकरी विकास पॅनल व नगरसेवक दिनकर पाटील यांच्या परिवर्तन पॅनलमध्ये तिरंगी लढत झाली. निवडणुकीत भ्रष्टाचार, गुंडगिरी आणि अपहाराच्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्यामुळे मतदानाच्या वेळी काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती,परंतु पुरेसा पोलीस बंदोबस्त असल्याने असे काही घडले नाही.
नाशिक बाजार समितीच्या १७ जागांसाठी ६३ उमेदवार रिंगणात उतरले असून, हमाल-माथाडी गटातून पिंगळे गटाचे चंद्रकांत निकम हे यापूर्वीच अनौपचारिकरीत्या बिनविरोध निवडून आले आहेत. रविवारी होणाऱ्या मतदानात सोसायटी व ग्रामपंचायत गटासाठी प्रत्येकी १४ मतदान केंद्रांचा समावेश होता, तर व्यापारी गटातील १५०७ पैकी १२८६ मतदारांनी शहरातील आर. पी. विद्यालयात मतदानाचा हक्क बजावला. त्याची टक्केवारी ८५.३३ टक्के इतकी झाली. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत गटातील १७८० मतदारांपैकी १७२२ इतक्या मतदारांनी मतदान केले. ही टक्केवारी ९६.७४ झाली. तर सोसायटी गटातील १२४८ मतदारांपैकी १२३६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात सर्वाधिक ९९.०३ टक्के मतदान झाले.
सर्वसाधारण गटातील सात जागांसाठी २४, दोन महिला राखीव गटासाठी सात उमेदवार रिंगणात होते. तसेच इतर मागास प्रवर्गात तीन, तर भटक्या विमुक्त जमाती प्रवर्गात दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने या दोन्ही गटांत सरळ सरळ लढत झाली. १६८ पैकी १०४ उमेदवारांनी माघार घेतल्याने १८ जागांसाठी ६४ उमेदवार रिंगणात होते; मात्र हमाल-माथाडीच्या एका जागेसाठी एकच अर्ज असल्याने या गटातील निवड बिनविरोध झाल्यात जमा आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Polling for 94 percent of Nashik Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.