संजय पाठक -
नाशिक : नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या चार विश्वस्तपदाच्या जागांसाठी मंगळवारी (दि. ३०) मुलाखती होणार आहेत. तथापि, यात गुन्हेगारांबरोबरच राजकारण्यांनाही बंदी घालण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. उमेदवार राजकारणी अथवा राजकारणाशी संबंधित नसावा, यासाठी शपथपत्रद द्यावे लागले आहे.
तब्बल १०८ अर्ज आले आहेत. कोणाची निवड होते याकडे लक्ष लागले आहे. नाशिकचे श्री काळाराम मंदिर अत्यंत प्राचीन आहे. कुंभमेळ्याच्या दृष्टीनेदेखील त्याचे अत्यंत महत्त्व असून, अमृतस्नानाच्या दिवशी येथे वैष्णवपंथीयांची गर्दी असते.
श्री काळारामाचे भक्त आहे हे कसे सिद्ध करायचे?विश्वस्तपदाचा अर्ज करताना त्यात अनेक गमतीशीर मुद्दे आहेत. यात अर्जदार आस्तिक/नास्तिक आहे काय? तसेच काळारामाचे भक्त असल्यास कसे, असा प्रश्न आहे. श्री काळारामाचे भक्त आहे हे पटवण्यासाठी काय पुरावे द्यावेत, असा प्रश्न पडला आहे. कोरोना योद्धा असल्यास त्याबाबतचा पुरावा मागितला आहे.. विश्वस्तपदाचा याच्याशी काय संबंध, असा अनेकांना प्रश्न पडला आहे.