पाच लाख बालकांना पोलिओ डोस
By Admin | Updated: February 23, 2015 00:14 IST2015-02-23T00:14:28+5:302015-02-23T00:14:29+5:30
पल्स पोलिओ : विल्होळी येथे झाला शुभारंभ; शुक्रवारपर्यंत राहणार मोहीम सुरू

पाच लाख बालकांना पोलिओ डोस
नाशिक : राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत रविवारी शहरासह संपूर्ण जिल्हाभरात पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली़ या मोहिमेद्वारे शहरात एक लाख २७ हजार ९९६ बालकांना, तर जिल्ह्यातील विविध तालुक्यांत ३ लाख ८४ हजार ३९४ असे एकूण ५ लाख १२ हजार ३९० बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले़
कथडा येथील डॉ़ झाकीर हुसेन रुग्णालयात महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला, तर विल्होळी येथील प्राथमिक उपकेंद्रात जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांच्या हस्ते लहान बालकाला पोलिओ डोस पाजून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला़
शहरात राबविण्यात आलेल्या या मोहिमेसाठी मनपा आयुक्त प्रवीण गेडाम व वैद्यकीय अधीक्षक डॉ़ बी़ आर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका क्षेत्रात ५५२ बुथ उभारण्यात आले होते़ यासाठी १६३७ कर्मचारी व ११८ पर्यवेक्षक, तर प्रभाग अधिकारी म्हणून मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती़
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ सुशील वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हाभरात राबविण्यात आलेल्या मोहिमेसाठी ३०८७ बुथ लावण्यात आले होते़ यासाठी ७८१२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती़ ग्रामीण व शहरी भागात ही मोहीम आणखीन पाच दिवस म्हणजेच २७ फेब्रुवारीपर्यंत चालणार असून, उर्वरित बालकांना घरोघरी जाऊन पोलिओचे डोस पाजले जाणार आहेत़
या मोहिमेसाठी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कर्मचारी, विभागीय अधिकारी, खासगी सहा़ परिचारिका, खासगी वैद्यकीय व्यावसायिक, अंगणवाडीसेविका यांनी विशेष परिश्रम घेतले़ (प्रतिनिधी)