नगरसेवकांची पोलीस उपआयुक्तांकडून चौकशी
By Admin | Updated: May 15, 2014 00:07 IST2014-05-15T00:01:16+5:302014-05-15T00:07:15+5:30
गुन्हेगारांशी कथित संबंध प्रकरण

नगरसेवकांची पोलीस उपआयुक्तांकडून चौकशी
गुन्हेगारांशी कथित संबंध प्रकरण
नाशिक : सराईत गुन्हेगार भीम पगारे टोळीने व्यावसायिकाचे अपहरण करून वसूल केलेल्या खंडणी प्रकरणात अटक केलेल्या गुन्हेगारांशी कथित संबंध प्रकरणी आज महापालिका विरोधी पक्षनेते, शिवसेना आणि मनसे नगरसेवकांची आज पोलीस उपआयुक्त अविनाश बारगळ यांनी चौकशी केली़ दरम्यान, ही चौकशी प्राथमिक स्वरूपाची असल्याचे बारगळ यांनी सांगितले़
मोहन चांगले खून प्रकरणातील संशयित गिरीश शेीवर जिल्हा रुग्णालयातील प्रिझन वॉर्डमध्ये झालेला हल्ल्याच्या प्रयत्न, सराईत गुन्हेगार भीम पगारेची हत्त्या आणि त्यापूर्वी एका व्यावसायिकाचे अपहरण करून उकळण्यात आलेली खंडणी या घटनांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांचे राजकीय हितसंबंध असल्याच्या कथित संशयावरून सेना-मनसेच्या चार नगरसेवकांना पोलिसांनी मंगळवारी नोटिसा बजावल्या होत्या़
पोलिसांनी मनपा विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते, शिवसेना नगरसेवक दत्तात्रय तथा डी़ जी़ सूर्यवंशी, मनसे नगरसेवक सतीश (बापू) सोनवणे यांना या नोटिसा बजावल्या होत्या़ पोलिसांनी बजावलेल्या या नोटिसीनुसार बुधवारी बडगुजर, सोनवणे आणि सूर्यवंशी हे तिघेही पोलीस उपआयुक्त अविनाश बारगळ यांच्या कार्यालयात हजर झाले होते़ या तिघांचीही बारगळ यांनी प्राथमिक चौकशी केली़ दरम्यान, गरज भासल्यास आणखीन काही लोकप्रतिनिधी तसेच राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येण्याचे सूतोवाचही बारगळ यांनी केले़ (प्रतिनिधी)
--कोट--
गरज भासल्यास आणखी लोकप्रतिनिधींची चौकशी
खंडणी प्रकरणातील गुन्हेगारांच्या चौकशीसाठी आणि तपासणीचा एक भाग म्हणून या तीनही नगरसेवकांना नोटीस देऊन बोलावण्यात आले होते़ याबाबत प्राथमिक स्तरावर ही चौकशी सुरू असून, याबाबत अधिक बोलणे उचित ठरणार नाही़ या प्रकरणी गरज भासल्यास आणखीन काही लोकप्रतिनिधी किंवा राजकीय पदाधिकार्यांना बोलावले जाऊ शकते़
- अविनाश बारगळ, पोलीस उपआयुक्त, नाशिक
संशयित प्रभागातील रहिवासी
नगरसेवक हा जनतेचा सेवक असतो, त्याच दृष्टिकोनातून आमचे काम सुरू आहे़ खंडणीतील काही संशयित आमच्या प्रभागातील रहिवासी असल्याने पोलिसांकडून नोटीस देण्यात आली होती़ त्यानुसार पोलीस उपआयुक्त कार्यालयात हजर झालो़ पोलिसांना तपासात संपूर्ण सहकार्य करणार आहोत़
- सुधाकर बडगुजर, विरोधी पक्षनेते, महानगरपालिका
गुन्हेगारांशी संबंध म्हणून बोलावलेले नाही
खंडणीतील गुन्हेगारांशी संबंध असल्याच्या कारणावरून आम्हाला बोलावलेले नाही़ शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी मी स्वत: प्रयत्नशील आहे़ पोलिसांना हवी ती मदत करण्यास मी तयार आहे़
- सतीश (बापू) सोनवणे, नगरसेवक, मनसे
चौकशी नाही, संवाद
गेल्या दहा वर्षांपासून जनतेने महापालिकेत लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले़ पोलीस उपआयुक्तांकडे आमची चौकशी नाही, तर संवाद झाला़
- डी़ जी़ सूर्यवंशी, नगरसेवक, शिवसेना
गडकरी चौकातील परिमंडळ-१ च्या पोलीस उपआयुक्त कार्यालयात चौकशीसाठी आलेले नगरसेवक सतीश सोनवणे व डी़ जी़ सूर्यवंशी़