आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणानंतर पोलिसांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:46 IST2021-02-05T05:46:25+5:302021-02-05T05:46:25+5:30
नाशिक : कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्याचे काम समाधानकारक आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात ...

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणानंतर पोलिसांचे लसीकरण
नाशिक : कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्याचे काम समाधानकारक आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच भविष्यात ज्यावेळी नागरिकांचे लसीकरण होईल त्यावेळी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाचे लसीकरण होण्यासाठी अधिक केंद्राची उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती, राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. आरोग्य कर्मचाऱ्यांनंतर पोलिसांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.
पोलीस मुख्यालयाच्या भीष्मराज सभागृहात आयोजित कोरोना सद्यस्थिती व उपाययोजना आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार उपस्थित होते.
बैठकीत पुढे बोलताना पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, लसीकरणाच्या सुरुवातीला लस घेताना अनेकांच्या मनात भीती होती. परंतु हळूहळू भीती दूर होऊन लसीकरणासाठी आरोग्य कर्मचारी पुढे येत असून आत्तापर्यंत नाशिक जिल्ह्यात लसीकरणाचे काम ७४ टक्के झाले आहे. लसीकरणाचा दुसरा टप्पा देखील लवकर सुरु होणार असून नव्याने १० केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्याची रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होतानाचे दिलासादायक चित्र आहे. त्यामुळे आवश्यकता नसलेले कोविड सेंटर बंद करुन आवश्यकता भासल्यास एका दिवसात यंत्रणा उभी करता येईल असे नियोजन आरोग्य विभागाने ठेवण्याबाबतची सूचना पालकमंत्री भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.फायर ऑडिटबाबत सर्व दवाखान्यांचा अहवाल एकत्र करुन आवश्यक त्या दुरुस्त्या करण्याबाबतचे सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. अग्निशमन प्रतिबंधात्मक उपाययोजना करतांना प्राधान्याने विजेसंदर्भातील दुरुस्त्या व पुरेशा पाण्याच्या टाक्यांचे नियोजन करावे. तसेच वर्षातून एकदा मॉक ड्रिल राबवून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी बैठकीत सांगितले.
इन्फो
मालेगावात लसीकरणासाठी विशेष मोहीम
नाशिक जिल्ह्यात महिन्याभरात कोरोना रुग्णांची संख्या ५० टक्क्यांनी कमी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील दिलासादायक असून मृत्यूदर अगदी नगण्य आहे,जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण चांगले असले तरी मालेगांवमध्ये लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.