पोलीस ठाणे हल्ला निषेधार्थ देवळाली कॅम्पला बंद
By Admin | Updated: January 17, 2015 00:12 IST2015-01-17T00:11:42+5:302015-01-17T00:12:21+5:30
पोलीस ठाणे हल्ला निषेधार्थ देवळाली कॅम्पला बंद

पोलीस ठाणे हल्ला निषेधार्थ देवळाली कॅम्पला बंद
देवळाली कॅम्प : उपनगर पोलीस ठाण्यावर शिकाऊ लष्कराच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी देवळाली कॅम्पला कडकडीत बंद पाळण्यात आला.
उपनगर पोलीस ठाण्यावर शिकाऊ लष्करी अधिकाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय पदाधिकारी व व्यापारी संघटनेने शुक्रवारी देवळाली कॅम्प बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. नगरसेवक बाबूराव मोजाड, सचिन ठाकरे, भाऊसाहेब धिवरे, शिवसेनेचे साहेबराव चौधरी, राजू चौधरी, चंद्रकांत गोडसे, रिपाइंचे विश्वनाथ काळे, संजय निकम आदि राजकीय पदाधिकाऱ्यांसह व्यापारी संघटनेचे सुरेश कुसाळकर यांनी यांनी देवळाली कॅम्पच्या मुख्य बाजारपेठ व रस्त्यावरून फेरी मारत व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले.
तसेच देवळाली कॅम्प- नाशिकरोड रिक्षा-टॅक्सी सेवादेखील बंद ठेवण्यात आली होती. देवळाली कॅम्पला कडकडीत बंद पाळण्यात आल्याने मुख्य बाजारपेठ व हमरस्ते निर्मनुष्य झाले होते. तर काही ठिकाणी रस्त्यावर क्रिकेटचा खेळ रंगला होता. दुपारनंतर बंद मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. मात्र सायंकाळीच पुन्हा दुकाने सुरू झाल्याने बाजारपेठ गजबजून गेली होती. (वार्ताहर)