शिवसेना महानगरप्रमुख बोरस्तेंची पोलीस चौकशी
By Admin | Updated: May 19, 2014 00:15 IST2014-05-18T23:30:45+5:302014-05-19T00:15:27+5:30
सुमारे दोन तास चौकशी : आज पुन्हा चौकशी

शिवसेना महानगरप्रमुख बोरस्तेंची पोलीस चौकशी
सुमारे दोन तास चौकशी : आज पुन्हा चौकशी
नाशिक : पगारे टोळीने व्यावसायिकाचे अपहरण करून वसूल केलेल्या खंडणी प्रकरणात अटक केलेल्या गुन्हेगारांशी कथित संबंध प्रकरणी आज शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांची सहायक पोलीस आयुक्त हेमराजसिंह राजपूत यांनी सुमारे दोन तास प्राथमिक चौकशी केली़ या चौकशीतील तपशील कळू शकला नसला, तरी बोरस्ते यांना सोमवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे़
मोहन चांगले खून प्रकरणातील संशयित गिरीश शेीवर जिल्हा रुग्णालयातील प्रिझन वॉर्डमध्ये झालेला हल्ल्याच्या प्रयत्न, सराईत गुन्हेगार भीम पगारेची हत्त्या आणि त्यापूर्वी एका व्यावसायिकाचे अपहरण करून उकळण्यात आलेली खंडणी या घटनांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांचे राजकीय हितसंबंध असल्याच्या कथित संशयावरून सेना-मनसेच्या चार नगरसेवकांना पोलिसांनी मंगळवारी (दि़ १३) नोटिसा बजावल्या होत्या़
पोलीस उपआयुक्त अविनाश बारगळ यांनी बुधवारी (दि़ १४) मनपा विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते, शिवसेना नगरसेवक दत्तात्रय तथा डी़ जी़ सूर्यवंशी, मनसे नगरसेवक सतीश सोनवणे यांची प्राथमिक चौकशी केली होती़ अजय बोरस्ते यांना पोलीस उपआयुक्त डॉ़ डी़ एस़ स्वामी यांनी नोटीस काढल्याने त्यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते़ मात्र ते परदेशात असल्याने येऊ शकले नव्हते़ दरम्यान, आज त्यांची राजपूत यांनी प्राथमिक चौकशी केली, तसेच गरज भासल्यास सोमवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)