घेरावाच्या भीतीने जिल्हाधिकारी कार्यालयाला पोलिसांचा वेढा
By Admin | Updated: May 6, 2017 01:22 IST2017-05-06T01:21:37+5:302017-05-06T01:22:34+5:30
सायखेडा : शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दिलेली धडक व पालकमंत्र्यांसमक्ष उडालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कार्यालयालाच सशस्त्र वेढा दिला.

घेरावाच्या भीतीने जिल्हाधिकारी कार्यालयाला पोलिसांचा वेढा
लोकमत न्यूज नेटवर्क
सायखेडा : दोन वर्षांपूर्वी गंगापूर धरणाच्या पाणीप्रश्नावरून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दिलेली धडक व पालकमंत्र्यांसमक्ष उडालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी निफाडचे शिवसेना आमदार अनिल कदम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्याच्या धमकीची दखल घेत पोलिसांनी संपूर्ण कार्यालयालाच सशस्त्र वेढा दिला.
निफाड तालुक्यातील अघोषित भारनियमन व पाणीपुरवठा योजनांचा खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी आमदार अनिल कदम यांनी सोशल मीडियावर शेतकऱ्यांना आवाहन करून ‘चलो जिल्हाधिकारी कार्यालय’ अशी हाक दिली, त्याचबरोबर जिल्हाधिकारी तसेच वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनीही जाहीर केल्यामुळे त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना दक्ष राहण्याबाबत अवगत केले होते. त्यामुळे सकाळी दहा वाजेपासूनच पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा ताबा घेऊन मुख्य प्रवेशद्वारावर सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात केला. साधारणत: अकरा वाजेनंतर आमदार अनिल कदम यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयात जमला, त्यावेळी मात्र पोलिसांनी शेतकऱ्यांना अडविण्याची भूमिका घेतली. वीज व पाण्याचा प्रश्न असल्याने शेतकऱ्यांकडून कायदा हातात घेण्याच्या भीतिपोटी पोलीस उपआयुक्त, सहायक आयुक्तांसह पोलीस निरीक्षकांनी या ठिकाणी तळ ठोकला तर साध्या वेशातील पोलीस कर्मचारीही तैनात करून शेतकऱ्यांवर लक्ष ठेवून होते. दंगा काबूत आणणाऱ्या पथकालाही या ठिकाणी पाचारण करण्यात आल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवाराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. आमदार कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फक्त निवेदन देण्यात येईल असे जाहीर करूनही पोलीस खबरदारी घेऊन उभे होते.