सिडको : मागील भांडणाची कुरापत काढून स्वामीनगरमधील सोपान टाळकुटे या युवकाचा खून करणारे संशयित करण ऊर्फ करण्या अण्णासाहेब कडुस्कर (१९), शैलेंद्र सुरेश दोंदे (२२) व रशीद शौकत पठाण (२०, तिघेही राहणार अंबड) या तिघांना अटक करण्यात आली आहे़ या तिघांनाही सोमवारी (दि़८) न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. रविवारी (दि़७) दुपारच्या सुमारास स्वामीनगरमध्ये ही घटना घडली होती़ रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास सोपान टाळकुटे यास अज्ञात व्यक्तीचा फोन आला़ यानंतर सोपान आपल्या किरण नामक नातेवाइकासह घराबाहेर पडून जवळील स्वामीनगरला गेला़ यावेळी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले संशयित करण कडुस्कर, शैलेंद्र दोंदे व रशीद पठाण हे समोर आले व त्यांनी मागील भांडणाची कुरापत काढून धारदार शस्त्राने सोपानवर वार केले़ मुलाचा आवाज ऐकून सोपानची आई मुलाला वाचविण्यासाठी गेली असता संशयितांनी तिलाही मारहाणकेली़ या तिघा संशयितांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात सोपानचा जागीच मृत्यू झाला़ यावेळी नागरिकांनी सजगता दाखवित पोलिसांची प्रतीक्षा न करता संशयितांना चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले़
स्वामीनगरमधील खुनातील संशयितांना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 01:15 IST