पोलिसांच्या बंदोबस्ताचा सोशल मीडियावर निषेध
By Admin | Updated: August 29, 2015 23:17 IST2015-08-29T23:15:49+5:302015-08-29T23:17:10+5:30
नेटिझन्सचा संताप : नाशिककरांनी पर्वणी साधलीच नाही

पोलिसांच्या बंदोबस्ताचा सोशल मीडियावर निषेध
नाशिक : कुंभमेळ्यास येणाऱ्या संभाव्य गर्दीचा बाऊ करून पोलिसांनी अतिदक्षता घेत घातलेल्या निर्बंधांमुळे भाविकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. कारण नसताना घातलेल्या निर्बंधामुळे बऱ्याचशा भाविकांनी पर्वणीला येणे टाळले. तर नाशिककरांनी पर्वणीचा योग साधलाच नसल्याच्या संतापजनक प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या.
पर्वणीसाठी एक कोटी भाविक येतील, असा अंदाज पोलीस आणि अन्य शासकीय यंत्रणांकडून व्यक्त केला जात होता. त्यामुळे पर्वणीच्या आदल्या दिवशीच शहरात नाकेबंदी केली गेली. शिवाय संपूर्ण शहराच्या मध्यवर्ती भागात करकचून बल्ली बॅरिकेडिंग आवळून धरल्याने संपूर्ण शहर धास्तावले गेले. शिवाय बाहेरून भाविकांनादेखील दूरपर्यंत पायपीट करावी लागणार असल्याचे अगोदरच जाहीर केल्याने त्यांच्यामध्येदेखील भीतीचे वातावरण होते. परिणामी बऱ्याचशा भाविकांनी पर्वणीत सहभागी होणे टाळल्याने प्रशासनाने वर्तविलेला अंदाज पूर्णत: चुकीचा ठरला. शिवाय पोलिसांच्या या भूमिकेमुळे भाविकांनी तीव्र संताप व्यक्त केला. सोशल मीडियावर तर नेटिझन्सनी पोलिसांना लक्ष करीत मनसोक्त टीका केली.
‘सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांचा चुकीचा अंदाज शासनापर्यंत पोहचवून काही मंडळींनी निधी भ्रष्टाचार केला आहे. चौका-चौकांत अडवणूक होत असल्याने नाशिककर घरात बसून टीव्ही पर्वणीचा सोहळा अनुभवत आहे, कोट्यवधी रुपयांच्या घाटावर दहा हजार भाविकदेखील स्नानासाठी उपलब्ध नाहीत, पोलिसांच्या बंदोबस्तामुळे माझ्याच शहरात मला मी परकं वाटत आहे, शाही मिरवणूक बघण्यासाठी भाविकच नसल्याने साधूंनीदेखील आटोपते स्नान केले, कुंभमेळ्यात एक कोटी भाविक येणार असल्याचा अंदाज पूर्णत: चुकला. आज देशात गुजरात पेटला आहे. महाराष्ट्रात दुष्काळी स्थिती आहे. गोदावरीच्या प्रदूषणाची कल्पना नाशिककरांना माहीत आहे. (प्रतिनिधी)