काव्यातून उमटले समाजव्यवस्थेवर भाष्य...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:28 IST2017-10-30T00:28:01+5:302017-10-30T00:28:08+5:30
‘मागतो संवाद टाळतो मी वाद आता, माणसाच्या अंतरंगाला घालतो साद आता’, ‘विद्रोह शिव्या नसतो, विद्रोह असतो तुकारामांच्या ओव्या’, ‘बाप जेवायचा, पण अर्धीच भूक राखून’ या आणि अशा विद्रोही कवितांचे सादरीकरण रविवारी (दि. २९) ‘देश आमचा देव नाही देह आहे’ या वैचारिक वादळी कविसंमेलनात करण्यात आले.

काव्यातून उमटले समाजव्यवस्थेवर भाष्य...
नाशिक : ‘मागतो संवाद टाळतो मी वाद आता, माणसाच्या अंतरंगाला घालतो साद आता’, ‘विद्रोह शिव्या नसतो, विद्रोह असतो तुकारामांच्या ओव्या’, ‘बाप जेवायचा, पण अर्धीच भूक राखून’ या आणि अशा विद्रोही कवितांचे सादरीकरण रविवारी (दि. २९) ‘देश आमचा देव नाही देह आहे’ या वैचारिक वादळी कविसंमेलनात करण्यात आले. परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कवी संमेलनात माणूस हा के ंद्रबिंदू मानून आजच्या समाज व्यवस्थेवर भाष्य करणाºया अनेकविध विद्रोही कवितांचे सादरीकरण करण्यात आले. पुणे येथील कवी रवींद्र कांबळे यांनी सुरुवातीला ‘मागतो संवाद टाळतो मी वाद आता’ ही कविता सादर करत आपल्या सभोवताली वेळोवेळी घडणाºया वादांवर भाष्य करण्याचा प्रयत्न केला. यानंतर दीप पारधे (ठाणे) यांनी ‘चौकातला देव’ या कवितेतून अंधश्रद्धा तसेच पुरोगामी विचारसरणीच्या नेत्यांच्या झालेल्या हत्या याबाबत कवितेतून टीका केली. उत्तरोत्तर हे काव्यसंमेलन रंगत असताना सोलापूर येथील कवी अंकुश आरेकर याने आपल्या कवितेतून आजची शिक्षण व्यवस्था कशी तकलादू आहे याचे दर्शन घडविले, तर सांगली येथील कवी नितीन चंदनशिवे यांनी आपल्या कवितेतून नास्तिकता, शेतकरी आत्महत्या, सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे देशवासीयांचे झालेले नुकसान याबाबत भाष्य केले. नाशिक येथील कवी भीमराव कोते पाटील यांनी ‘माणसांच्या कविता’ या कवितेतून पुरोगामी, मूलतत्त्ववादी विचारसरणी अनुसरणाºया समाजातील घटकांवर मार्मिक भाष्य केले.
‘देश आमचा देव नाही देह आहे’ या काव्यसंमेलनाचा नाशिक येथे सातव्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील विविध ठिकाणी झालेल्या या कविसंमेलनात जागतिक घडामोडी समोर ठेवून, देश, देशातील प्रत्येक नागरिक, भयमुक्त, रोगमुक्त, निर्भयपणे जगावा यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती आकाश सोनवणे यांनी दिली. या कविसंमेलनास काव्य रसिकांनी मोठ्या प्रमाणत गर्दी केली होती.
अनेक कवींचा सहभाग
कवी आकाश सोनवने यांच्या संकल्पेनेतून साकारलेल्या या काव्यसंमेलनात अंकुश आरेकर (सोलापूर), भीमराव कोते पाटील (नाशिक), राजेंद्र राठोड (पनवेल), सागर काकडे (सातारा), रवींद्र कांबळे (पुणे), नितीन चंदनशिवे (सांगली), जित्या जाली (पुरंदर), दीप पारधे (ठाणे), सुमित गुणवंत (शिरूर), हृदयमानव अशोक (अहमदनगर), गुरुनाथ साठेलकर (खोपोली) यांनी सहभाग नोंदवला.