शेतमाल विक्रीसाठी आलेल्या सिन्नरच्या शेतकऱ्याची लूट
By Admin | Updated: September 11, 2016 01:40 IST2016-09-11T01:39:35+5:302016-09-11T01:40:29+5:30
शेतमाल विक्रीसाठी आलेल्या सिन्नरच्या शेतकऱ्याची लूट

शेतमाल विक्रीसाठी आलेल्या सिन्नरच्या शेतकऱ्याची लूट
नाशिक : दिंडोरी रोडवरील
मार्केट यार्डमध्ये शेतमाल विक्री केल्यानंतर घरातील कुटुंबीयांसाठी खारी खरेदी करणाऱ्या
सिन्नरच्या शेतकऱ्यास पेठ रोडवरील तिघा संशयितांनी लुटल्याची
तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली़ पंचवटी पोलीस ठाणे जवळ असूनही घडलेल्या या घटनेमुळे शेतमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़
सिन्नर तालुक्यातील पाटपिंपरी येथील शेतकरी राजेंद्र पोपट उगले
हे गुरुवारी (दि़ ८) वाटाणे विक्रीसाठी दिंडोरी रोडवरील मार्केट यार्डात आले होते़ रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास वाटाणे विक्रीतून आलेल्या पैशातून ते कुटुंबातील लहान मुलांसाठी मार्केट यार्डच्या गेटजवळील दुकानातून खारी खरेदी करीत होते़
यावेळी संशयित जोसेफ सुरेश जाधव (२४, रा़ लक्ष्मणनगर, पेठरोड, पंचवटी, नाशिक), दीपक दशरथ जाधव (३२, रा़ लक्ष्मणनगर, पेठरोड, पंचवटी, नाशिक) व संदेश पगारे (रा़ पेठरोड, नाशिक) हे तिघे उगले यांच्याजवळ आले़ या संशयितांपैकी एकाने उगले यांच्या खिशात हात घालून दोन हजार सातशे रुपये बळजबरीने काढून घेतले़
या तिघांना उगले यांच्या चुलत्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता उर्वरित दोघांनी हातात दगड घेऊन जिवे ठार मारण्याची धमकी दिली़ याप्रकरणी राजेंद्र उगले यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात या तिघांविरुद्ध जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, या तिघांनाही पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे़ (प्रतिनिधी)