बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट
By Admin | Updated: May 6, 2017 01:06 IST2017-05-06T01:06:19+5:302017-05-06T01:06:32+5:30
चांदवड : येथील बाजार समितीत शासनाचा निर्णय हमाली, तोलाई, वाराई घेऊ नये, असे असतानाही हमाली, तोलाई व वाराईच्या नावाखाली एका ट्रॅक्टरमागे सुमारे ४०० ते ५०० रुपयांची रक्कम कापली जाते.

बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट
महेश गुजराथी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदवड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत वजनकाटा हा वे-ब्रिजवर होत असताना हिशेबपट्टी, सौदापट्टी करताना प्रत्यक्षात पोते नसताना पोते लिहिले जाते. शासनाचा निर्णय हमाली, तोलाई, वाराई घेऊ नये, असे असतानाही हमाली, तोलाई व वाराईच्या नावाखाली एका ट्रॅक्टरमागे सुमारे ४०० ते ५०० रुपयांची रक्कम कापली जाते. असा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी चांदवड येथे काही शेतकऱ्यांनी एका व्यापाऱ्याच्या खळ्यावर या मुद्द्यावर वाद घालत बाजार समितीच्या सचिव व कर्मचाऱ्यांनी खळ्यावर येऊन तातडीने दखल घेतली. मात्र याप्रश्नी चांदवड बाजार समितीने त्वरित निर्णय घ्यावा, असे निवेदन शेतकऱ्यांनी सचिवांना दिले आहे.
चांदवड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या कांदा शेतमालाच्या लिलावानंतर कांद्याचे वजन वे-ब्रिजवर इलेक्ट्रॉनिक काट्यावर होते. याचे पैसेही शेतकरीच देतो. त्यानंतर कांदा व्यापाऱ्याच्या खळ्यावर नेला जातो व शेतकरी टॅक्टरचे फाळके स्वत: पाडतो किंवा हमाल फक्त फाळके पाडतो. ट्रॅक्टर हॅड्रोलिक होऊन आॅटोमॅटिक खाली होतो. या प्रक्रियेत काटा करण्याचे काम माथाडी कामगाराकडून होत नाही. पावती करीत असताना कृषी उत्पन्न बाजार समिती त्यावर पोत्याची नोंद करते, मात्र प्रत्यक्षात पोते भरले जात नाही. त्या अनुषंगाने मात्र हमाली, तोलाई, वाराई कपात केली जाते. या सर्व प्रकारात शेतकऱ्याची सुमारे ५०० रुपयांची लूट केली जाते. प्रत्येक बाजार समितीत दररोज सुमारे १५०० ट्रॅक्टर कांद्याची आवक होते व ५०० रुपयाप्रमाणे ७५ हजार रुपये काही कारण नसताना कापले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला असून, ही चक्क लूट असल्याचा आरोप शेतकरीवर्गाने केला आहे.
या निवेदनावर बापू अहेर, सुधाकर अहेर, मोहन जाधव, अशोक अहेर, प्रदीप कारभारी सोनवणे, हेमंत जाधव, रमेश जाधव, गिरिधर देसले, निंबा जाधव, राजेंद्र सुकदेव मोरे, शांताराम देवरे, शंकर भदाणे, हिरामण निकम, गोकुळ निकम, शरद पवार, चिंधा जाधव, अमोल सोनवणे, मधुकर अहिरे, विशाल सूर्यवंशी, रवींद्र संसारे, हेमंत सूर्यवंशी, शांताराम माळी आदींसह अनेक शेतकऱ्यांचा सह्या आहेत.
याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीशी संपर्क साधला असता, प्रत्यक्षात पोते भरले जात नाही, पावतीवर मात्र पोते लिहिले जाते, याबाबत योग्य तो निर्णय संचालकांच्या कानी टाकून घेऊ, असे सांगण्यात आले. चांदवड येथे एका खळ्यावर हॅड्रोलिक ट्रॉलीतून कांदा खाली करताना शेतकरी. त्यामुळे हमाली, तोलाई, वाराईचा संबंध येतोच कुठे?