निफाड-पिंपळगाव रस्त्याची दुर्दशा
By Admin | Updated: July 1, 2017 00:40 IST2017-07-01T00:40:43+5:302017-07-01T00:40:57+5:30
निफाड : निफाड ते पिंपळगाव बसवंत रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून, या रस्त्याची अक्षरश: वाट लागली आहे.

निफाड-पिंपळगाव रस्त्याची दुर्दशा
लोकमत न्यूज नेटवर्क
निफाड : निफाड ते पिंपळगाव बसवंत रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून, या रस्त्याची अक्षरश: वाट लागली आहे. त्यामुळे निफाड, पिंपळगाव, दावचवाडी, लोणवाडी यांसह इतर गावांतील नागरिकांत प्रचंड संतापाचे वातावरण पसरले आहे.
निफाड तालुक्यातील निफाड, पिंपळगाव या शहरांना जोडणारा आणि सुरत-शिर्डी साईमार्ग अशी ओळख असणारा हा रस्ता आहे. रस्ता सध्या जागोजागी खड्ड्यांनी विणलेल्या जाळ्यासारखा दिसत आहे. निफाड हे तालुक्याचे ठिकाण आणि भारतातील मुख्य शेतमाल बाजारपेठ पिंपळगाव (ब.) यांना जोडणारा हा रस्ता पूर्णपणे दुर्लक्षित झाला आहे. या रस्त्याच्या क्षेत्रात दावचवाडी, नांदुर्डी, कारसूळ, कुंदेवाडी, पालखेड, रौळस, निफाड ही गावे येतात. या गावांतून व तालुक्याच्या इतर भागातून दररोज भाजीपाला, फळे, दूध यांची या रस्त्यावरून वाहतूक होत असते. परंतु मालवाहतूक करणाऱ्या या ट्रक, टेम्पो, जीप व इतर वाहनांना हे खड्डे चुकवत प्रवास करावा लागतो. या रस्त्यावरून दररोज ये-जा करणाऱ्या दुचाकी वाहनचालकांना पाठीचे आजार जडले आहेत. शेजारील गुजरात राज्यातून साईदर्शनासाठी दररोज हजारो भाविक पायी व वाहनांनी प्रवास करतात. या भाविकांना रस्त्याने मोठी कसरत करत साईदर्शनास जावे लागत असल्याने या रस्त्याबद्दलची नाराजी त्यांच्या चर्चेतून दिसते. या खड्ड्यांच्या रस्त्यामुळे परराज्यातसुद्धा पिंपळगाव रस्त्याचे नाव गेले असून, या रस्त्याची नाचक्की परराज्यात
होत आहे. आजवर या रस्त्यावर खड्डे चुकविताना अनेक अपघात झालेले आहेत, तर काहींचा मृत्यू ओढावलाय.
नागरिकांनी आवाज उठवल्यास केवळ कसेबसे अत्यन्त निकृष्ट पद्धतीने हे खड्डे बुजविले जातात आणि थोड्याच दिवसांत परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ होते. मागील पूर्ण वर्षभरात एकदाही रस्त्याचे काम झाले नाही. विशेष म्हणजे, पिंपळगाव बसवंतचे मोठमोठे नेतेही या प्रश्नावर मूग गिळून बसले आहेत. या प्रश्नावर राजकीय पक्ष तर थंड गोळ्यासारखे झालेले दिसत आहेत. विशेष म्हणजे, मागे या रस्त्याचे टेंडरही निघाले होते. मग नेमकी माशी कुठे शिंकली, असा सवाल प्रवासी व नागरिक करीत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने हा प्रश्न गांभीर्याने घेऊन हे मोठमोठे खड्डे बुजवावे, अशी मागणी प्रवासी व नागरिकांनी केली आहे.