रसिकांनी अनुभवली नाट्यपर्वणी

By Admin | Updated: October 13, 2016 00:17 IST2016-10-12T23:47:55+5:302016-10-13T00:17:10+5:30

प्रायोगिक रंगभूमी : नाशिकच्या कलावंतांचा आविष्कार

Playwright experiences the audience | रसिकांनी अनुभवली नाट्यपर्वणी

रसिकांनी अनुभवली नाट्यपर्वणी

नाशिक : नाट्यलेखक दत्ता पाटील आणि दिग्दर्शक सचिन शिंदे या जोडगोळीच्या प्रतिभेतून प्रायोगिक रंगभूमीवर दबदबा निर्माण केलेल्या ‘हंडाभर चांदण्या’, ‘गढीवरच्या पोरी’ आणि ‘डेटिंग विथ रेन’ या तीन नाटकांची पर्वणी रसिकांनी बुधवारी सलगपणे अनुभवली आणि नाशिकच्या कलावंतांच्या आविष्काराला उत्स्फूर्तपणे शाबासकीची थापही दिली.
सोशल नेटवर्किंग फोरम आणि ट्रायसन यांच्या संयुक्त विद्यमाने तीन नाटकांचा हा महोत्सव प. सा. नाट्यगृहात रसिकांसाठी विनामूल्य आयोजित करण्यात आला होता. एकमेकांहून वेगळा बाज असलेल्या या तीनही नाटकांनी सध्या प्रायोगिक रंगभूमीवर धूम चालविली असून, दबदबा निर्माण केला आहे. महोत्सवात वाट बघण्यातील व्याकुळतेतही जगण्यातील संगीत शोधत वास्तवाचे भान आणून देणारे ‘हंडाभर चांदण्या’, पाच युवतींच्या जगण्यातील वास्तव आणि स्वप्नांचे कोलाज मांडणारी विराणी ‘गढीवरच्या पोरी’ आणि हरवलेले प्रेम ते प्रेमात हरवण्यापर्यंतचा विलक्षण दिलखुलास प्रवास सांगणारे ‘डेटिंग विथ रेन’ या तीन नाटकांचे सादरीकरण झाले.
या नाटकांमध्ये प्राजक्त देशमुख, मोहिनी पोतदार, प्रणव प्रभाकर, दीप्ती चंद्रात्रे, नूपुर सावजी, श्रद्धा देशपांडे, पीयूष नाशिककर, मयुरी मंडलिक, अरुण इंगळे, राहुल गायकवाड, राजेंद्र उगले, दत्ता अलगट, गीतांजली घोरपडे, सई आपटे, प्रज्ञा तोरसकर, पल्लवी पटवर्धन, प्रतीक शर्मा, धनंजय गोसावी यांनी भूमिका साकारल्या. तीनही नाटकांची निर्मिती व्यवस्था ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद जोशी व कैलास पाटील यांची होती, तर निर्मितीप्रमुख लक्ष्मण कोकणे व ईश्वर जगताप आहेत.
नाटकाचे नेपथ्य राहुल गायकवाड, प्रकाश योजना प्रफुल्ल दीक्षित, वेशभूषा- श्रद्धा-नूपुर, संगीत रोहिद सरोदे यांचे होते. तर रंगभूषा माणिक कानडे यांची होती. यावेळी सोशल नेटवर्किंग फोरमचे संस्थापक प्रमोद गायकवाड आणि ट्रायसनचे संचालक भूषण व रुपेश कविश्वर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Playwright experiences the audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.