भारतीय जंगलांवर अमेरिकेतून आणलेल्या 'सुंदरीं'चा हल्लाबोल

By अझहर शेख | Updated: March 12, 2025 06:47 IST2025-03-12T06:46:21+5:302025-03-12T06:47:32+5:30

देशी प्रजातींच्या अस्तित्वाला निर्माण होतोय धोका

Plants imported from America are attacking Indian forests | भारतीय जंगलांवर अमेरिकेतून आणलेल्या 'सुंदरीं'चा हल्लाबोल

भारतीय जंगलांवर अमेरिकेतून आणलेल्या 'सुंदरीं'चा हल्लाबोल

नाशिक : घाणेरी (गुलतुरा), ओसाडी, झिंजिरी, टाकळा, टिकोमा, कॉसमॉस, रानमारी यांसारख्या दिसायला सुंदर, मात्र झपाट्याने वाढणाऱ्या मूळच्या अमेरिकन असलेल्या वनस्पतींनी मागील काही वर्षांमध्ये राज्यातील राखीव जंगलांवर हल्लाबोल केला आहे. अलीकडेच भारतीय वन सर्वेक्षण ऑफ इंडियाने (एफएसआय) प्रसिद्ध केलेल्या २०२३-२४च्या अहवालातसुद्धा या बाबीकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

जंगलांना माणसांपासून नव्हे, तर विदेशी प्रजातीच्या काही वनस्पतींपासूनही धोका आहे. मूळच्या अमेरिकन वनस्पती भारतात शोभीवंत फुलझाडे म्हणून आणण्यात आल्या अन् कालांतराने त्या इतक्या फोफावत गेल्या की, त्यांनी राज्यातील राखीव वनांवर आक्रमण केले. यामुळे स्थानिक प्रजातीची झाडे, झुडुपे, वेलवर्गीय वनस्पतींचे अस्तित्व धोक्यात सापडले आहे.

वन्यप्राण्यांवर ओढावते उपासमारीचे संकट

एका अभ्यासातील निष्कर्षानुसार घाणेरी या विदेशी वनस्पतीच्या बेफाम वाढीमुळे तामिळनाडूच्या मृदमलाई व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या संख्येवरसुद्धा परिणाम झाला होता.

तृणभक्षी प्राण्यांसाठी उपयुक्त गवताच्या प्रजाती धोक्यात येतात. परिणामी त्या गवत खाणाऱ्या प्राण्यांवर उपासमारीचे संकट ओढावते. पाळीव प्राण्यांसाठी अशा वनस्पती घातक ठरतात.

उपद्रवी विदेशी प्रजातीच्या वनस्पतींचे आक्रमण जर वेळीच नियंत्रणात आणले नाही, तर वनांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो. या वनस्पती स्थानिक उपयुक्त व पर्यावरणपूरक वनस्पतींचा नाश करत आहेत. त्यांचे उच्चाटन गरजेचे आहे - शेखर गायकवाड, वृक्ष अभ्यासक
 

Web Title: Plants imported from America are attacking Indian forests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.