ठळक मुद्दे ग्रामपालिकेत हार : समितीसह नगरपंचायत निवडणुकीची चर्चा
विधानसभा निवडणुकीत नंबर दोनचा पक्ष ठरलेली शिवसेना ४४ ग्रामपंचायतींतील २७१ जागा मिळवत निवडणुकीत अव्वल ठरली आहे. अनेक ठिकाणी मुरब्बी राजकारण्यांना धूळ चारत नवखे उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाले. आगामी काळात तालुक्यातील सर्वात मोठी अर्थवाहिनी असलेल्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक येऊन ठेपली आहे, यामध्ये ग्रामपंचायत गटातील ४ संचालक निवडले जातात, शिवाय तालुक्यातील सर्वाधिक जागेवर शिवसेना आणि शिवसेना पुरस्कृत उमेदवार निवडून आल्यामुळे बाजार समिती निवडणुकीसाठी शिवसेनेच्या आशा उंचावल्या आहेत. पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आणि माजी उपसभापती विजय कारे, निवृत्ती धनवटे यांना आपली ग्रामपंचायत राखता आली नाही. दात्याने येथे नवखा चेहरा अनिरुद्ध पवार यांनी धनवटे यांची २० वर्षांची सत्ता संपुष्टात आणली तर विजय कारे यांना सुधाकर गावले यांनी पराभूत केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे निफाड तालुका अध्यक्ष राजेंद्र डोखळे यांच्या पत्नीचा २७ मतांनी सुयोग गीते या ३० वर्षांच्या तरुणाने पराभव केला. ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक नवीन चेहरे पुढे आले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळातील बाजार समितीची निवडणूक वेगळी दिशा घेईल, असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान, ओझर सोसायटी सभागृहात तालुक्यातील निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार माजी आमदार अनिल कदम यांच्या हस्ते करण्यात आला.
Web Title: Pimpalgaon market committee directors hit on the home pitch
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.