पिंपळगावी चोरट्यांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:14 IST2021-09-19T04:14:57+5:302021-09-19T04:14:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पिंपळगाव बसवंत : शहरात चोरट्यांचा धुमाकूळ वाढला असून, एकच दिवसाआड आणि तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन ...

पिंपळगावी चोरट्यांचा धुमाकूळ
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळगाव बसवंत : शहरात चोरट्यांचा धुमाकूळ वाढला असून, एकच दिवसाआड आणि तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन मोबाईल आणि एक दुचाकी चोरत पोबारा केला आहे. चोरट्यांनी पिंपळगाव येथील नागरिकांनाच नव्हे तर पोलिसांच्यादेखील नाकीनऊ आणले असून, त्यांना पकडण्यासाठी पोलीस प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. या चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.
यातील चोरीची पहिली घटना गुरुवार, दि. १६ रोजी मुंबई - आग्रा महामार्गावर चिंचखेड चौफुलीच्या उड्डाणपुलाखाली घडली. येथील शिवगणेश प्रतिष्ठान गणपती मंडळात चार्जिंगला लावलेला राजेंद्र सोनवणे यांचा ७ हजार रुपयांचा मोबाईल अज्ञाताने लांबविला. दुसरी घटना उत्तर प्रदेशहून कामानिमित्त आलेल्या मोहम्मद जुबेर राशी अलवी यांनी त्यांचा विवो कंपनीचा सोनेरी रंगाचा ६,५०० रुपयांचा मोबाईल शुक्रवार, दि. १७ रोजी पिंपळगाव बाजार समितीतील व्यापाऱ्यांच्या बिके फ्रुट गाळ्यात चार्जिंगला लावलेला असताना अज्ञाताने लंपास केला. तर चोरीची तिसरी घटना शहरातील जोपुळ रस्त्यावरील हॉटेल पाटीलवाडा येथे घडली. राहुल महेंद्र तलरेजा (वय ३२, रा. लंबोदर अपार्टमेंट, अभंग नगर, नवीन आडगाव नाका, पंचवटी, नाशिक) यांच्या मालकीची तीस हजार रुपयांची होंडा शाईन कंपनीची काळ्या रंगाची टाकीवर लाल पट्टा असलेली दुचाकी क्रमांक (एमएच १५, सीजी २३१२) ही चोरट्यांनी चोरून नेली. या तिन्ही घटनांची फिर्याद पिंपळगाव पोलीस ठाण्यात दाखल असून, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक पावसे अधिक तपास करत आहेत.