Peth taluka again free of corona! | पेठ तालुका पुन्हा कोरोनामुक्त !

पेठ तालुका पुन्हा कोरोनामुक्त !

ठळक मुद्देदिलासा : जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख १६ हजार ३८० रुग्ण झाले बरे

नाशिक : तब्बल दोन महिन्यांच्या काळानंतर जिल्ह्यातील पेठ तालुका पुन्हा कोरोनामुक्त झाला आहे. जिल्ह्यात एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढत असताना पेठ तालुक्यातील रुग्णसंख्या शून्यावर आल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही काहीसा दिलासा मिळू शकला आहे.

जिल्ह्यातील १ लाख १६ हजार ३८० कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्य:स्थितीत १ हजार ९८३ रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत २ हजार ९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या पेठमध्ये शून्यावर तर सुरगाण्यात अवघी ४ आहे. नाशिक ग्रामीणच्या अन्य तालुक्यांमध्ये नाशिक ५३, चांदवड ११, सिन्नर ४८, दिंडोरी ३९, निफाड ८५, देवळा १६, नांदगाव ५६, येवला १३, त्र्यंबकेश्वर १६, कळवण १८, बागलाण २७, इगतपुरी १६, मालेगाव ग्रामीण ४१ असे एकूण ४४३ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ३६७, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात १५८ तर जिल्ह्याबाहेरील १५ असे एकूण १ हजार ९८३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख २० हजार ४५३ रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये ९६.४० टक्के, नाशिक शहरात ९६.९६ टक्के, मालेगावमध्ये ९३.२० टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९४.३४ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९६.६२ इतके आहे. नाशिक ग्रामीण ८२४ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ३५, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १७६ व जिल्ह्याबाहेरील ५५ अशा एकूण २ हजार ९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील १८ सेंटर पुन्हा कार्यान्वित
जिल्ह्यातील पेठ कोरोनामुक्त झाले असले तरी ग्रामीणच्या अन्य तालुक्यांमध्येदेखील कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे आरोग्य विभागातर्फे खबरदारीची उपाययोजना म्हणून ग्रामीण भागातील १८ कोविड सेंटर पुन्हा कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सर्व कार्यरत असलेल्या केंद्रांमधील कोविड चाचण्यांची संख्यादेखील वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Web Title: Peth taluka again free of corona!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.