कुंभमेळ्यासाठी कायमस्वरूपी जागा
By Admin | Updated: February 22, 2015 00:35 IST2015-02-22T00:34:35+5:302015-02-22T00:35:39+5:30
कुंभमेळ्यासाठी कायमस्वरूपी जागा

कुंभमेळ्यासाठी कायमस्वरूपी जागा
नाशिक : कुंभमेळ्यात लागणाऱ्या जागेसाठी शासनाच्या वतीने कायमस्वरूपी जागा ताब्यात घेण्यात येईल तसेच यापुढे कुंभमेळ्याची तयारी वेळेत व्हावी यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दरम्यान, गेल्यावेळी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शाही मिरवणुकीसाठी पर्यायी मार्ग स्वीकारण्यास तयार झालेल्या साधु-महंतांनी अचानक घुमजाव करीत हा मार्ग स्वीकारार्ह नसल्याचे सांगितले.
नाशिक आणि त्र्यंबेकश्वर येथील कुंभमेळा तयारीसंदर्भात नाशिकरोड येथील विभागीय कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यावेळी फडणवीस यांनी कामाचा आढावा घेतानाच कुंभमेळ्याची कामे वेळेत पूर्ण होतील असा विश्वास व्यक्त केला. कुंभमेळा तोंडावर आला असून, आता वेळ कमी राहिला आहे. त्यामुळे कुंभमेळ्याची कामे द्रुतगतीने व्हावी यासाठी अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, या बैठकीतच साधु-महंतांनी विविध मागण्या केल्या. कुंभमेळ्यातील शाही मिरवणुकीसाठी प्रशासनाने पर्यायी शाहीमार्ग तयार दर्शविला आहे, परंतु त्यासाठी साधु-महंतांना विश्वासात घेतले गेले नाही, असा दावा करीत त्यास विरोध करण्यात आला. तसेच कुंभमेळ्यासाठी कायमस्वरूपी जागा मिळावी, कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी प्राधिकरण असावे, अशा विविध मागण्या करण्यात आल्या. नाशिकचे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधु-महंतांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यासाठी २ कोटी ४ लाख आणि रॉकेल आणि इंधन आदिंच्या व्यवस्थेसाठी ३ कोटी ९२ लाख रुपये याप्रमाणे तरतूद करण्यात आल्याची माहिती दिली. तर नाशिकचे महापालिका आयुक्त डॉ. प्रवीणकुमार गेडाम यांनी नाशिक महापालिकेने १ हजार ५२ कोटी रुपयांच्या कुंभमेळा कामांची तयारी सुरू केली आहे. तथापि, रस्त्यांची कामे रस्ता रुंदीकरणात बाधित झाडांमुळे अडल्याचे सांगितले.
या बैठकीस पालकमंत्री गिरीश महाजन, नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हसकर, नाशिकचे विभागीय आयुक्त एकनाथ डवले, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, हेमंत गोडसे तसेच स्थानिक आमदार आणि अधिकारी उपस्थित होते.