त्र्यंबकेश्वरला कायमस्वरूपी उपाययोजना करणार : नयना गावित
By Admin | Updated: March 26, 2017 22:43 IST2017-03-26T22:43:42+5:302017-03-26T22:43:58+5:30
त्र्यंबकेश्वर : नाशिक जिल्हा परिषद उपाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्याआधी नयना गावित यांनी शनिवारी भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले.

त्र्यंबकेश्वरला कायमस्वरूपी उपाययोजना करणार : नयना गावित
त्र्यंबकेश्वर : नाशिक जिल्हा परिषद उपाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्याआधी नयना गावित यांनी शनिवारी भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्र्यंबकेश्वर पंचायत समिती कार्यालयात आयोजित बैठकीला उपस्थित राहून त्यांनी सर्वप्रथम तालुक्यातील पाणीटंचाई प्रश्नात हात घातला. नाशिक जि. प. उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर गावित पहिल्यांदा त्र्यंबकेश्वरला आल्या होत्या.
नयना गावित यांच्या रूपाने गावित कुटुंबीयांची चौथी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे. पदार्पणातच त्यांनी जि. प. उपाध्यक्षपदाला गवसणी घातली आहे. भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन झाल्यानंतर त्या थेट त्र्यंबकेश्वर पंचायत समितीच्या सभागृहात दाखल झाल्या. यावेळी पंचायत समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, मातोश्री निर्मला गावित या इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या आमदार म्हणून गेली आठ वर्षे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यामुळे तालुक्याची पाणीटंचाई मी जवळून पाहिली आहे. यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी लागणार आहे. या परिस्थितीत धरण पाझर तलाव आदि योजना शक्य आहे काय, याबाबत पाटबंधारे, लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आदिंशी चर्चा करून लवकरच पाणी योजनांचा निर्णय घेण्यात येऊन पाणीटंचाई कायमची दूर करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांनी प्रास्ताविक केले. पंचायत समिती उपसभापती रवींद्र भोये, संपतराव सकाळे आदिंनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर जि. प. सदस्य शकुंतलाबाई डगळे, पं. स. उपसभापती रवींद्र भोये, संपत सकाळे, मधुकर मुरकुटे उपस्थित होते. यावेळी कार्यालयीन अधीक्षक संधान, जाधव या अधिकाऱ्यांसह पुरुषोत्तम लोहगावकर, दिलीप मुळाणे, पांडुरंग आचारी तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष कैलास चव्हाण, जयराम मोंढे, राजेंद्र बदादे, सोमनाथ भुतांबरे, भूषण अडसरे, गणपत कोकणे, कल्पेश कदम, ललित लोहगावकर, संतोष डगळे उपस्थित होते. (वार्ताहर)